रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतसाठी ४० लाख रुपयांची योजना यापुढे सादर करता येईल. यात गाव तलाव, चेक डॅम, नाला रुंदीकरण व खोलीकरण आदी कामे करण्याची तरतूद आहे, अशी घोषणा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
अरविंद देशमुख प्रतिष्ठानने वडविहिरा येथे स्थापन केलेल्या अरविंद कृषी मुक्त विद्यापीठातर्फे  आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कृषी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. फळबाग लागवड योजनेत शेततळे, उथळ विंधन विहीर, कूपनलिका, तुषार-ठिबक सिंचन कामे घेण्यात येणार आहेत. सिंचन विहिरीसाठी ३ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे. कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसायासाठी रोजगार हमी योजना कार्यक्रमांतर्गत यापुढे अनुदान देण्यात येईल. ग्रामीण भागातील काही योजनांना अर्थसाह्य़ मिळू शकेल. यासाठी ग्रामीण जनतेने पुढे यावे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.
आधुनिक पद्धतीने आणि मजुरांविना शेती केल्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही, असा सूर मेळाव्यात पाहुण्यांनी व्यक्त केला. मेळाव्याला माजी मंत्री रणजित देशमुख, अरिवद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढगे, माजी कृषीमंत्री नानाभाऊ एंबडवार, आमदार डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार सुनील िशदे, बाबुराव तिडके, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, रामराव वानखडे, कृषी सलागार प्रा. सुभाष नलांगे, राहयो उपायुक्त डॉ. उदय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी डाखोळे, कृषी अधिकारी रत्नाकर येवले, सुरेश बोराडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.अशोक ढगे व प्रा. सुभाष नलांगे यांनी विद्यापीठाचा आराखडा व कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. सुनील िशदे यांनी संत्रा उत्पादकांच्या समस्या मांडल्या. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचा पाढाचा त्यांनी वाचला. स्वित्र्झलडच्या कंपनीकडून २०० कोटींचा संत्रा कारखाना मंजूर झाला होता, पण तोही अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना नांदेड येथे पळविण्यात आला, याबद्दल िशदे यांनी तीव्र टीका केली. सरकारच्या कृषी योजना अतिशय कुचकामी आहेत, असे बाबुराव तिडके यांनी म्हणाले.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या दैनावस्थेला शासनाची ‘गो स्लो पॉलिसी’ कारणीभूत असल्याचा आरोप डॉ. बोंडे यांनी केला. द्राक्ष, ऊस या पिकांना सरकार संरक्षण देते त्याप्रमाणे संत्रा, कपाशीला संरक्षण का देत नाही? असा सवाल डॉ. बोंडे यांनी केला. विदर्भाच्या शेतीने आधुनिकतेकडे वाटचाल करावी या हेतूने हा मेळावा आयोजित केला आहे. नव्या पीक व मशागत पद्धती, कृषी पर्यटन, कृषी प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने अरिवद कृषी (मुक्त) विद्यापीठ सुरू करण्यात आले.
 सरकारने पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला दिलेला अग्रक्रम शेतीला द्यावा, अशी मागणी रणजित देशमुख यांनी मेळाव्याच्या समारोपप्रसंगी बोलताना केली. मेळाव्याचे संचालन अनिल महात्मे यांनी केले तर आभार रमेश फिस्के यांनी मानले.