मध्य भारतातील सातपुडा पर्वतरागांच्या कुशीतील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या हजारो आदिवासींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देताना सातपुडा फाऊंडेशनने पारंपरिक नृत्यातून उदरनिर्वाहाचे अनोखी दिशा दाखविली आहे. ‘जंगलस्त्रोतांची पिळवणूक नव्हे तर संवर्धन करा’ असा संदेश देणाऱ्या आदिवासी नृत्य पथकाने पारंपरिक गोंडी नृत्य ‘सायला’च्या माध्यमातून रोजगार मिळवतानाच काळाच्या उदरात गडप झालेल्या या नृत्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचीही कला साधली आहे.
गोंडी नृत्यातील आदिवासींचे थिरकणे आता जवळजवळ कालबाह्य़ झाल्यातच जमा आहे. त्यामुळे या नृत्यप्रकाराची पूर्ण माहिती असणारी आदिवासींची पिढी आता हयात नाही किंवा वयोवृद्ध झाली आहे. कधीकाळी केवळ जंगलातच नृत्य सहजीवनाचा आनंद लुटणारे गोंडी आदिवासी आता ‘प्रोफेशनल’ नर्तक म्हणून विकसित करण्यात सातपुडा फाऊंडेशनच्या स्वयं मदत गटांची मोलाची मदत झाली आहे. जुन्या काळी गोंडी नृत्य कलाप्रकार अत्यंत लोकप्रिय होता. त्यांचे वाद्यांच्या तालावर थिरकताना पाहणे एकप्रकारचा आनंद देते. परंतु, जुन्या पिढीतील फारच कमी आदिवासी आता उरले आहेत. सातपुडा फाऊंडेशनने या नृत्य प्रकाराच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास घेऊन गोंडी नृत्य जाणकारांचा एक स्वयं मदत गट स्थापन केला. या गटातील नर्तक आता पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून ‘प्रोफेशनल डान्स ग्रुप’ प्रमाणे देशभरातून ‘ऑर्डर’ घेत असून त्यांना उदरनिर्वाहाचा नवा मार्ग खुला झाला आहे.
गौण वनउपजांवर अवलंबून असलेल्या आदिवासींना धोकादायक बफ र झोनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांना रोजगाराचे विविध पर्याय देण्याच्या उद्देशाने गोंडी नृत्य प्रकाराचा आधार घेऊन व्यवसायाचा आधुनिक मार्ग दाखविण्यात आल्याचे सातपुडा फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी अनुप अवस्थी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. मोगली पेंचच्या जंगलातील आदिवासी गोंडी नृत्य करीत असल्याची माहिती २००८ साली फाऊंडेशनने मिळवली. परंतु, त्यावर थिरकण्याची कला जाणणारे आणि वाद्य वाजविणारे फार कमी संख्येने उरले होते. महाराष्ट्राच्या सावरा खेडय़ातील आदिवासी लोकनृत्याचे एक ज्येष्ठ जाणकार ए.के. मानकर यांच्या साह्य़ाने फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी वृद्ध आदिवासींशी संवाद साधून या नृत्यप्रकाराची सखोल माहिती जाणून घेतली. एका वयोवृद्ध आदिवासीने याकामी प्रचंड उत्साहाने मदत केली.
हा नृत्यप्रकार ‘सायला’ म्हणून आदिवासींमध्ये ओळखला जातो. मान्सून येण्यास विलंब झाला तर ‘सायला’ नृत्य करण्याची परंपरा आदिवासींनी जपली आहे. कारण, ‘सायला’ नृत्य केले तर पाऊस लवकर पडतो, अशी आदिवासींची श्रद्धा आहे. यानंतर सातपुडा फाऊंडेशनने सावरा खेडय़ातील १३ लोकांचा एक गट तयार करून त्यालाच स्वयं मदत गटात परावर्तित केले. पत्रके आणि तोंडी प्रचार करून नृत्याबद्दल पर्यटकांना माहिती पुरविली. या गटातील नर्तकांसाठी पारंपरिक वेषभूषा आणि अन्य वाद्य प्रकारही फाऊंडेशने गोळा केले. नृत्याची व्हिडिओ फितदेखील तयार करण्यात आली. गेल्या चार वर्षांत विविध भागात नृत्यकलेचे अप्रतिम प्रदर्शन करून या आदिवासी नृत्य गटाने १ लाख ६ हजार रुपये कमावले आहेत. अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबांच्या दृष्टीने या रकमेला ‘कोटय़वधींचे मोल’ आले आहे.
याच रकमेतून एका गरजू आदिवासी युवकाला कर्ज देऊन कपडय़ांचे दुकान थाटून देण्यात आले. या तरुणाने कर्जाची रक्कमही फेडली आहे. मेळघाटातील हिरवळीत अशा अनेक कहाण्या दडलेल्या आहेत.