कल्याण-डोंबिवलीतील ११ पोलीस ठाण्यांबाहेरील कार्यालयांच्या कोपऱ्यात अनेक जुनाट, अपघात झालेल्या, जप्त केलेल्या गाडय़ा वर्षांनुवर्षे उभ्या आहेत. धूळ, कचऱ्याने वेढलेली ही वाहने पोलीस ठाण्याचे सौंदर्य घालवतातच शिवाय डेंग्यू व इतर संसर्गजन्य रोगांना आमंत्रण देत आहेत. पोलीस ठाण्यांबाहेर सडत पडलेली ही वाहने तातडीने उचलण्यात यावीत, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका मनीषा धात्रक यांनी पोलिसांकडे केली आहे.
देश, राज्यभर स्वच्छता मोहीम शासनातर्फे सुरू असताना अशा प्रकारे पोलीस ठाण्यांबाहेर सडलेल्या गाडय़ांचा कचरा स्वच्छता मोहिमेला हरताळ फासत आहे. ही वाहने वर्षांनुवर्षे एकाच जागी उभी असल्याने, तेथे स्वच्छता होत नसल्याने रोगाची आगार झाली आहेत. आता डेंग्यूची साथ या सगळ्या गलिच्छ वातावरणामुळे पसरत आहे. याचे भान पोलिसांनी ठेवावे आणि पोलीस ठाण्यांबाहेरील सर्व गंजलेली वाहने गोदाम, नागरिकांना उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवावी, अशी मागणीही धात्रक यांनी केली आहे. डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावर विष्णुनगर पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याबाहेर सडलेली वाहने, कुजलेल्या रिक्षा प्रवाशांचे स्वागत करतात. या वाहनांच्या आडोशाला फेरीवाले बसतात. त्यामुळे या रस्त्यावरून मग वाहनांची ये-जा करणे कठीण होऊन बसते. कल्याण, डोंबिवलीतील बहुतेक पोलीस ठाण्यांच्या आवारात, पोलीस ठाण्याबाहेरील रस्त्यावर गंजलेली वाहने उभी आहेत. ती तातडीने हटवून भारत स्वच्छ अभियानाला पोलिसांनी हातभार लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यांबाहेर जप्त केलेली, अपघातग्रस्त आणि चोरांकडून पकडलेली वाहने असतात. ही वाहने ठेवण्यासाठी जागा मिळावी यासाठी पालिकेकडे वेळोवेळी मागणी करण्यात येते. कल्याणमध्ये ही वाहने ठेवण्यास पालिकेने जागा दिली आहे. डोंबिवलीत तशी जागा नाही. जागेच्या अडचणीमुळे वाहने पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात येतात. काही वाहनांचा विमा असतो. काही प्रकरणे न्यायालयीन असतात. त्यामुळे ही वाहने ठेवावी लागतात. काही वाहनांचा नंतर लिलाव केला जातो. मुबलक जागा उपलब्ध झाली तर पोलीस ठाण्यांसमोरील सर्व वाहने एका जागी ठेवता येतील, असे कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले. शासनातर्फे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात पोलिसांचा सक्रिय सहभाग आहे. पोलीस ठाणी स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. अभियानाला पोलीस कोणताही हरताळ फासत नसल्याचे उपायुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.