नवी मुंबईची सायबर सिटी अशी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या खारघरला अतिक्रमणकारांचा विळखा घट्ट बसला आहे. पोलीस व सिडको प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांवरील नियंत्रण गमावल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सध्या खारघर स्थानकाच्या मार्गावर भंगाराची पाच दुकाने रातोरात थाटली आहेत.
सिडकोच्या नियोजनबद्ध सायबर सिटीला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. फेरीवाले व भंगारवाल्यांनी राजरोस रस्त्याकडेला असणाऱ्या जागेवर मिळेल तिकडे झोपडय़ा उभारून आपले धंदे थाटले आहेत. या बेकायदा फेरीवाल्यांच्या जिवावर हप्तेखोरी करून पोलिसांचा उदरनिर्वाह येथे चालला जातो. याची स्पष्टोक्ती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर पोलिसांना फेरीवाल्यांकडून हप्त्याची रक्कम घेताना रंगेहाथ पकडून हे सिद्ध केले आहे. सायबर सिटीमधील घरांची किंमत ५० लाखांहून अधिक आहे. याच घरांसमोरील फुटपाथी फेरीवाल्यांसाठी आंदण ठरल्या आहेत. रहिवाशांनी नेमके चालायचे कोठून असा प्रश्न पडला आहे. सिडकोच्या कारवाईच्या दिवशी सायंकाळपर्यंतच फुटपाथीचा श्वास मोकळा होतो. मात्र त्यानंतर पुन्हा त्या फुटपाथीचा ताबा फेरीवाल्यांकडे येतो. या सर्व घटनाक्रमामुळे खारघर शहरात सिडकोच्या अतिक्रमनविरोधी पथक व पोलिसांचा वचक गमावला असून येथे अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडय़ा, फेरीवाले व भंगारमाफिया यांचे राज्य असल्याचे दिसते. पोलीस सिडकोच्या बांधकाम नियंत्रण विभागाकडे बोट दाखवितात आणि सिडकोच्या बांधकाम नियंत्रकांना विचारल्यावर ते अपुरे मनुष्यबळाचे कारण पुढे करतात. याबाबत सिडकोचे बांधकाम नियंत्रक विभागाचे प्रमुख अनिल पाटील यांना विचारले असता ते बैठकीत व्यस्त असल्यामुळे ते जास्त काही बोलू शकले नाहीत.
सायबर सिटीच्या प्रवेशद्वारावरून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या अर्धा किलोमीटरच्या पल्यावर ही पाच गोदामे भंगार माफियांनी थाटली आहेत. रातोरात ही गोदामे कोणी उभारली याबाबत येथे काम करणारे कोणीही सांगण्यास तयार नाहीत.
वसाहतीमधील फुटपाथी व रस्ते मोकळे व्हावेत यासाठी सिडकोला अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र तेथून प्रतिसाद मिळत नाही. उलटसरशी खारघर वसाहतीमध्ये सिडको अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेणार असल्याची पूर्वकल्पना येथील फेरीवाल्यांना मिळते ती कशी, याचाही तपास लागत नाही.
पंढरी पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक