मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या तंबीमुळे गाढ झोपेत असणाऱ्या अतिक्रमण विभागाला मंगळवारी अखेर जाग आली. मध्यवस्तीतील प्रमुख मार्गावरील छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्याचा श्रीगणेशा ‘धडक’ स्वरूपात झाला असला तरी संबंधित विक्रेत्यांनी अवघ्या काही तासात पुन्हा आपापल्या जागा व्यापल्याचे दिसले. यामुळे पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहिमेचे स्वरूप पहिल्या दिवशी तरी ‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ याच धाटणीचे राहिले.
विकास कामांचे नियोजन करण्यासाठी मागील आठवडय़ात नाशिकला आलेल्या राज यांनी शहरात अस्ताव्यस्तपणे पसरलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश दिले होते. मनसे अध्यक्षांनी ही सूचना करेपर्यंत पालिकेचा हा विभाग न्यायालयीन आदेशाची प्रतीक्षा करायचा. म्हणजे, न्यायालयाचा आदेश येईपर्यंत कोणतेही अतिक्रमण हटवायचे नाही, अशी त्याची भूमिका राहिली. राज यांनी तंबी दिल्यामुळे सुस्तावलेल्या अतिक्रमण विभागाने हातपाय मारण्यास सुरूवात केली. आगामी दौऱ्यात राज यांच्याकडून अतिक्रमण विरोधी मोहिमेचा आढावा घेतला जाणार असल्याने या विभागाने मंगळवारी अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला.
शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजे महात्मा गांधी रोड, मध्यवर्ती बसस्थानकालगतचा परिसर, दहीपुलाकडे जाणारा रस्ता आदी भागात अतिक्रमण विरोधी पथकाने रस्त्यावर थाटली जाणारी दुकाने, फळ विक्रेत्यांच्या हातगाडय़ा, खाद्य पदार्थाचे स्टॉल्सधारक यांची साधनसामग्री जप्त केली. पोलीस बंदोबस्त असल्याने फारसा विरोध झाला नाही. दोन विभागीय अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या ताफ्याने प्रमुख मार्गावर जी अतिक्रमणे दृष्टीपथास पडली, तेथील साधनसामग्री जप्त केली. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांची धावपळ उडाली. काहींना आधीच कुणकुण लागल्याने त्यांनी हातगाडय़ा सुरक्षित ठिकाणी नेल्या.
या मोहिमेमुळे वाहतूक कोंडीत सापडणारे रस्ते मोकळा श्वास घेतील, ही अपेक्षा अतिक्रमणधारकांनी फोल ठरविली. ज्यांची साधनसामग्री जप्त झाली, त्यांनी काही वेळातच टेबल आणत आपले व्यवसाय पूर्ववत केले. महात्मा गांधी रस्त्यावरील खाद्य पदार्थाच्या विक्रेत्यांचा त्यात समावेश होता. ज्या ज्या भागात पहिल्या दिवशी मोहीम राबविली गेली, त्या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र होते. परिणामी, रस्ते खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकले नाहीत.
या संदर्भात अतिक्रमण विभागाचे प्रमुख आर. एम. बहिरम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त भागात आता अतिक्रमण विरोधी पथकाकडून नव्याने अतिक्रमण होऊ म्हणून गस्त घातली जाईल, असे सांगितले. या विभागाचा पदभार स्वीकारून एक दिवस झाला असल्याने त्यांनी मोहिमेच्या नियोजनाबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
अतिक्रमण विभागाचे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या तंबीमुळे गाढ झोपेत असणाऱ्या अतिक्रमण विभागाला मंगळवारी अखेर जाग आली. मध्यवस्तीतील प्रमुख मार्गावरील छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्याचा श्रीगणेशा ‘धडक’ स्वरूपात झाला असला तरी संबंधित विक्रेत्यांनी अवघ्या काही तासात पुन्हा

First published on: 03-07-2013 at 09:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encroachment in nashik roads