फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशे, ध्वनिक्षेपकासह रिक्षा,जोरदार घोषणाबाजीत सांगली महापालिकेच्या प्रचाराचे धुमशान शुक्रवारी सायंकाळी ५ वा. समाप्त झाले. महापालिकेच्या ७८ सदस्यांसाठी ३८ प्रभागातून ५२२ उमेदवार  रिंगणात उतरले आहेत.
आज सकाळपासून शहरातील गल्लोगल्ली प्रचारफेरीने उमेदवारांनी मतदारांना आवाहन करीत प्रचाराची सांगता केली. जाहीर प्रचाराची सांगता आज झाल्याने वेळ गाठण्यासाठी उमेदवारांची व कार्यकर्त्यांची धांदल उडाली होती. महापालिका निवडणूक रिंगणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोठय़ा ताकदीने उतरले असून मतदारांना तिसरा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाने शेतकरी संघटना, जनता दल, रिपाइं, कम्युनिस्ट यांच्या सोबतीने ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ रिंगणात उतरविली आहे.  याशिवाय शिवसेना आणि मनसे हेही आपले भवितव्य आजमावत आहेत.
जाहीर निवडणूक प्रचाराची सांगता होताच एक गठ्ठा मतांसाठी उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. रात्र-रात्र भेटीगाठी करण्यास मर्यादा येणार आहे. कारण पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून  ‘रात्री दहाच्या आत घरात’ ही भूमिका घेतल्याने उमेदवारांची गोची होत आहे.
 उमेदवारांमध्ये तब्बल १९५ उमेदवार महिला असून त्यापैकी ५ महिलांनी सर्वसाधारण गटासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. महापालिकेसाठी चार गटांसाठी दुरंगी लढत होत असून ११ ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. होणाऱ्या दुरंगी लढतीत तीन गट महिलांसाठी आरक्षित आहेत. तर विद्यमान नगरसेवक धनपाल खोत, संजय मेंढे आणि अपक्ष म्हणून अनिल कुलकर्णी हे सपत्नीक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर सुलोचना खोत आणि अनिता खोत या कुपवाडमधील उमेदवार नात्याने सासू-सुना आहेत.
यंत्रणा सज्ज
महापालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर करण्यात येणार असून ४९५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रत्येक केंद्रासाठी ४ कर्मचारी व १ केंद्राध्यक्ष असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
 महापालिकेसाठी रविवारी मतदान होणार असून प्रायोगिक तत्त्वावर वॉर्ड क्रमांक २२ ची मतमोजणी मतदान संपल्यानंतर तातडीने करण्यात येणार आहे. त्याचदिवशी रात्री ८.३०पर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल असे मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले. अन्य प्रभागातील मतमोजणीसाठी मिरजेतील वखार महामंडळाच्या गोदामात व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी (दि. ८) मतमोजणी होणार असून त्याच दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील.