मुलुंड पश्चिम येथील सार्वजनिक शिक्षण संस्था संचालित लोकमान्य टिळक इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अमोल ढमढेरे, ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक मंगेश ठाकूर  उपस्थित होते. शाळेचे संस्थापक व सहसचिव आणि लोकमान्य टिळक इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचे सभापती डॉ. विवेक देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  यावेळी अमोल ढमढेरे यांच्या हस्ते शाळेच्या ‘व्हिजन’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना आपला छंद जोपासण्याचे महत्त्व आणि ते जोपासल्यामुळे मिळणारे यश याचा कानमंत्र दिला.
 गिरीश कुबेर यांच्या हस्ते शाळेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी, विद्यार्थ्यांना सतत प्रयोग करत राहण्याचा त्याचबरोबर आयुष्यात खचून न जाण्याचा सल्ला दिला. डॉ. विवेक देशपांडे यांनी विद्यार्थी व पालकांना, शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलींना मार्शल आर्ट व बेसिक मिलिटरी कोर्स शिकवण्याचे आवाहन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व उपक्रम माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अखेरीस कला, क्रीडा व शैक्षणिक कारकीर्दीत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सायली दळवी आणि पर्यवेक्षिका माला नाईक आणि इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते.