पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील तरणतलावात शनिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या मुलाचे नाव सुमित भागवत मठापती (२२) असे आहे. सुमित भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायन विभागात तिसऱ्या वर्षांत शिकत होता.
सुमित हा मूळचा नांदेड जिल्ह्य़ामधील रहिवासी. तो शिक्षणासाठी खारघर येथील वसतिगृहात राहत होता. शनिवारी सुमित आणि त्याचे मित्र कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहण्यासाठी आले होते. तरणतलावात चार फूट खोल पाण्यात पोहताना सुमित बुडाला.
पोलिसांच्या चौकशीवरून सुमितला थोडय़ा प्रमाणात पोहता येत होते. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुमित बुडताना तरणतलावातील लाइफगार्ड का वेळीच धावून आले नाहीत, त्या वेळी लाइफगार्ड कामावर होते का, याविषयी सहायक पोलीस निरीक्षक अनंत पाटील अधिक चौकशी करीत आहेत.
कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील तरणतलावात यापूर्वीही चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणारी क्रीडानगरी आहे. 

Story img Loader