नवी मुंबई शहराच्या विकासात अभियंत्यांचे महत्त्वाचे योगदान असून या शहराचा नियोजनबद्ध चेहरा कायम राहावा यासाठी महापालिका यापुढेही प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी केले. नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने बेलापूर येथील दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्स येथे रविवार अभियंता दिन साजरा करण्यात आला. या वेळी जऱ्हाड बोलत होते.
जागतिक ख्यातीचे अभियंता भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. नवी मुंबई महानगर महापालिकेने हा कार्यक्रम बेलापूर येथे साजरा केला. महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सह शहर अभियंता जी. व्ही. राव, सिडकोचे अधीक्षक अभियंता व्ही. सी. कांबळे, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अनिल नेरपगार, चिचारिया आदी मान्यवर उपस्थित होते.    शहरात नवे विकास प्रकल्प आकारला येत आहेत. अशा वेळी काम करत असताना अभियंत्यांनी कामाच्या गुणवत्तेस अधिक महत्त्व देण्याची गरज आहे.   दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडताच त्या त्या विभागातील अभियंत्यांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे आपण केलेले काम चोख असेल यासाठी प्रत्येक अभियंत्याने लक्ष द्यायला हवे, असेही जऱ्हाड म्हणाले.   या वेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता व्ही. सी. कांबळे यांचे व्याख्यान झाले, तर मोहन डगावकर यांनी प्रास्ताविक केले.   

Story img Loader