‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ आणि ‘लोकसत्ता यशस्वी भव’ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्य़ातील पोलादपूर तालुक्यातील कापडे येथील वरदायिनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
लेखक साहेबराव महाजन यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. देवळे आणि कोतवाल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मर्म समजावून सांगितले.
बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुनील चव्हाण यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाल्याचे नमूद करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमात सहभागी झालेल्या शाळेतील उच्च गुणवत्ताप्राप्त चार विद्यार्थ्यांना बँकेने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊ केली होती. यंदासुद्धा शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणाही चव्हाण यांनी या वेळी केली. या वेळी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये ‘लोकसत्ता यशस्वी भव प्रश्नपत्रिका संच’ वितरित करण्यात आले. या वेळी शाळा समिती सभापती सि. दा. सकपाळ, मुख्याध्यापिका माळी, पर्यवेक्षक पवार, रविकांत सकपाळ, गुलाबराव येरुणकर, रामदास सकपाळ हे उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे सुशील मेहेंदळे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे गिरीश सर आणि इतर या वेळी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.