बाबा चमत्कारच्या हातातलं हाडूक, विचित्र वस्तुसंग्रहालयातून बाहेर उडत येणारी वटवाघळं, लावणी करणाऱ्या मदनिकेचा हात लोकांच्या अगदी जवळ येतो आणि चित्रपटगृहातील लोक थक्क होतात. थ्रीडी तंत्रज्ञान आपल्यासाठी नवीन नसलं, तरीही ‘झपाटलेला २’सारखा मराठी चित्रपट थ्रीडीमध्ये बघण्याची लज्जत वेगळीच आहे. सशक्त कथानकाची जोड मिळाली असती, तर हा चित्रपट आणखी सुरेख झाला असता.
तरुणीच्या गालावर पावडरची लाली ही तिच्या मूळ सौंदर्यात भर घालणारी असावी, असं म्हणतात. त्या पावडरचा लालिमा जास्त पसरला, तर ते कृत्रिम वाटतं आणि मूळ सौंदर्यालाही धक्का पोहोचतो. चित्रपट आणि तंत्रज्ञानाचं गणितही तसंच आहे. तंत्रज्ञान किंवा इफेक्ट्स हे चित्रपटाच्या मूळ गाभ्याला पूरक असावेत. ते तसे नसतील तर चित्रपटाचा पोतच बिघडतो. ‘झपाटलेला २’च्या बाबतीत सुदैवानं तसं झालेलं नाही.
वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘झपाटलेला’ची मोहिनी आजही अनेक प्रेक्षकांवर आहे. भित्र्या लक्ष्याचा वेंधळेपणा, तडफदार इन्स्पेक्टर महेश जाधव आणि बाहुला असूनही काळजात धडकी भरवणारा तात्या विंचू यांनी त्या वेळच्या प्रेक्षकांचा ‘थरथराट’ केला होता. वीस वर्षांनंतर याच चित्रपटाचा पुढील भाग बनवताना महेश कोठारे यांनी काळाच्या बरोबर पावलं टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
तुरुंगातून पळालेला कुबडय़ा खविस (अभिजित चव्हाण) विचित्र वस्तुसंग्रहालयातून तात्या विंचूचा बाहुला चोरतो. हा बाहुला घेऊन तो बाबा चमत्कारकडे (राघवेंद्र कडकोळ) येतो. एका अपघाताने हा बाहुला जिवंत होतो आणि परकाया प्रवेशासाठी धडपडतो. लक्ष्या मेला असला, तरी लक्ष्याच्या मुलाच्या शरीरात आपला आत्मा शिरू शकेल, हे कळल्यानंतर तो श्रीरंगपूरमध्ये येऊन धडकतो. श्रीरंगपूरमध्ये आदित्य लक्ष्मीकांत बोलकेचा (आदिनाथ कोठारे) शोध घेतो. त्याच्या मागे लागत परकाया प्रवेशासाठी धडपडतो. मग कमिशनर महेश जाधव (महेश कोठारे) आणि आदित्य बोलके हे दोघे त्याचा बिमोड करतात.
चित्रपटाची कथा बरी असली, तरी त्यात काही अनावश्यक गोष्टींचा भरणा आहे. त्या गोष्टी वजा करून तात्या विंचूची ‘टेरर’ ठसवली असती, तर चित्रपट खरंच ‘झपाटलेला’ झाला असता. चित्रपट मुंबई आणि श्रीरंगपूर येथे चित्रित होतो. त्यातही प्रामुख्याने श्रीरंगपूरच्या जत्रेत. या जत्रेत मकरंद वटवटे (मकरंद अनासपुरे) यांच्या बोलक्या बाहुल्यांचा तसेच चंपा सातारकर (विशाखा सुभेदार) हिच्या लावणीचाही तंबू आहे. चंपा सातारकरची मुलगी मेघा (सोनाली कुलकर्णी) आणि आदित्य यांचे पहिल्याच भेटीत प्रेम होते. श्रीरंगपूरच्या जत्रेचं वृत्तांकन करायला आलेली गौरी (सई ताम्हणकर) आणि मकरंद वटवटे यांचा वेगळाच ट्रॅक तयार होतो. त्याचप्रमाणे आदित्य आणि मकरंदच्या तंबूचा गुरखा हनम्या (दीपक शिर्के) यांची मस्ती मात्र चित्रपटातला वेळ वाया घालवते.
वीस वर्षांचा पुढे गेलेला काळ ‘एस्टॅब्लिश’ करण्यासाठी कोठारे यांनी एक-दोन संदर्भ दिले आहेत. ‘झपाटलेला’मधील इन्स्पेक्टर महेश जाधव आता कमिशनर बनला आहे तर हवालदार सखाराम आता श्रीरंगपूरच्या पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टर. तात्या िवचूच्या हावभावांतूनही काळ पुढे गेल्याचं ठसतं. थ्रीडी तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्पेनचा तंत्रज्ञ एन्रिके आणि छायाचित्रणकार सुदेश देशमाने यांनी आपली बाजू भक्कम सांभाळली आहे. ‘मदनिके’ गाण्यातील गिमिक्स किंवा या तंत्रज्ञानाच्या आधारे धक्का देणारे काही प्रसंग अप्रतिम झाले आहेत.
या चित्रपटाची लंगडी बाजू म्हणजे कथानक! तात्या विंचू श्रीरंगपूपर्यंत कसा पोहोचतो, हेच नेमकं लक्षात येत नाही. तात्याला परकाया प्रवेश करण्याची निकड आहे, हेच स्पष्ट होत नाही. आधीच्या चित्रपटात लक्ष्याच्या बावळटपणामुळे तात्या जास्त प्रभावी वाटला होता. पण या चित्रपटात आदित्य आजचा हीरो असल्यानं त्याला तात्या विंचू जिवंत आहे, हेच पटत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनाही तो थरार जाणवत नाही. त्याऐवजी मकरंद आणि तात्याचा प्रसंग अधिक चांगला झाला आहे. कदाचित ‘सबकुछ आदिनाथ’ करण्याच्या नादात ही चूक राहून गेली असावी.
आदित्य बोलके म्हणून आदिनाथने प्रामाणिकपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची संवादफेक काहीशी खटकते. कथानकात सोनालीला फारसं स्थान नाही. मात्र तिचा वावरच सुखावून जातो. मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर यांच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत. कमिशनर महेश जाधवच्या भूमिकेत महेश कोठारे यांनी आपला आवडता ‘डॅम इट’ शब्द म्हणून लोकांच्या टाळ्या घेतल्या आहेत. रामदास पाध्ये यांनी पुन्हा वीस वर्षांनी तात्या जिवंत केला आहे. पण त्यांच्याबरोबरच दिलीप प्रभावळकर यांचाही वाटा मोठा आहे. चित्रपट बघताना लक्ष्याची गैरहजेरी नक्कीच जाणवते. थ्रीडी तंत्रज्ञान वापरून तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट म्हणून हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.
कोठारे अ‍ॅण्ड कोठारे व्हिजन निर्मित
झपाटलेला-२
निर्माता-दिग्दर्शक – महेश कोठारे, कथा-पटकथा-संवाद – अशोक पाटोळे, संगीत – अवधूत गुप्ते, गीते- गुरू ठाकूर, कलावंत – दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, आदित्य कोठारे, सोनाली कुलकर्णी, मधु कांबीकर, सई ताम्हणकर, विजय चव्हाण, विजय पटवर्धन, दीपक शिर्के, महेश कोठारे.