गोबऱ्या गालावर ओघळणारे अश्रू.. एका हातात घट्ट धरलेले चॉकलेट आणि दुसऱ्या हाताने आई वा बाबांचे धरलेले बोट.. पाठीवर वेगवेगळी ‘कार्टुन्स’ची लटकविलेली नवी दप्तरे.. सोबत रंगीबेरंगी ‘वॉटरबोटल’.. ‘स्कुल चले हम’ची साद घालत दिमाखात दाखल होणारी बाल गोपाळांची फौज.. आणि त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या शिक्षिका.. कुठे औक्षण तर कुठे गुलाबपुष्पांनी स्वागत.. अशा वातावरणात सोमवारी शहर व परिसरात शाळेतील पहिल्या दिवसाचा श्रीगणेशा झाला.
सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात झाली. नव्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात दमदार, उत्साहपूर्ण व्हावी, यासाठी अनेक विद्यालयांनी जय्यत तयारी केली होती. या संदर्भात राज्य शासनाने सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर परिसरातील अनेक विद्यालयांनी रंगरंगोटीचे काम करवून घेतले. नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा आपलीशी वाटावी, यासाठी काही संस्थांनी बालगोपाळांच्या वर्गात त्यांचे आवडते छोटा भीम, डोरोमन, बालगणेश, टॉम अ‍ॅण्ड जेरी आदींची चित्रे रेखाटली. इतकेच नव्हे तर, पहिल्या दिवसाचे औचित्य साधून पताकांची आकर्षक सजावट करण्यात आली. दर्शनी भागातील सूचना फलकांवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे फलकही झळकविण्यात आले. प्रथमच शाळेत येणारे विद्यार्थी इतक्या गर्दीत लक्षात येत होते. या विद्यार्थ्यांना शाळेत बसविण्यास आई-वडिलांबरोबर शिक्षकांचीही चांगलीच कसरत झाली.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेत प्रथमच येणारे विद्यार्थी तसेच प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे अभिनव बाल विकास मंदिर, महापालिकेच्या शाळा, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सिडको परिसरातील पेठे विद्यालयात महिला शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. तत्पुर्वी, प्रवेश द्वाराजवळ विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन त्यांची बडदास्त ठेवण्यात आली. मधल्या सुट्टीत जेवणानंतर विद्यार्थ्यांना मिष्ठान्नाचे वाटप झाले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात विद्यार्थीनींचे स्वागत तसेच शैक्षणिक गुढी उभारून करण्यात आली. मुख्याध्यापिका वाल्हू माळी व पर्यवेक्षिका स्वाती गलांडे यांनी सरस्वती व गुढीचे पूजन केले. नवे वर्ष उत्साहपूर्ण असावे तसेच या काळात उत्तम ज्ञान ग्रहण व्हावे, मन व मनगटाला बळ मिळावे, अशी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. निलीमा दुसाने यांनी संस्कृत श्लोकांचे पठण केले. प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कुलच्यावतीने घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. काही विद्यालयांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
एकिकडे स्वागताचा अभुतपूर्व उत्साह असताना दुसरीकडे काही शाळांनी मात्र सरकारी आदेश धाब्यावर बसवत काहीशा निरूत्साहाने कामकाजाला सुरूवात केली. काही विद्यालयांच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. शाळा अनेक दिवस बंद राहिल्याने वर्गात धूळ व जळमटे जमा झाली होती. ती स्वच्छ करण्याची तसदी ना शिक्षकांनी घेतली ना तेथील कर्मचाऱ्यांनी. आलेल्या विद्यार्थ्यांना स्वत: बाकांची स्वच्छता करावी लागली.