शाळेच्या पहिल्या दिवशी लहानग्यांचे सनई-चौघडय़ासह किंवा बँडबाजासह स्वागत करायचे, जमले तर गुलाल उधळायचा असे अनेक जंगी बेत अनेक शाळांनी आखले होते. जोरदार तयारीही केली होती. परंतु शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या सगळ्या तयारीवर पाणीच ओतले. पण शाळांनी हार न मानता शाळेत पहिल्यांदाच पाय ठेवणाऱ्या लहानग्यांच्या स्वागतामध्ये कोणतीच कसर राहू दिली नाही. उघडय़ावर स्वागत करण्यास अडथळा आला तरी शाळेच्या आत, वर्गात मात्र जल्लोशात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. सजवलेले वर्ग, खाऊची पाकिटे, खेळ आणि अभ्यासाला सुट्टी अशा वातावरणाची शाळा या लहानुल्यांना आवडलीच पाहिजे, असा चंगच शाळांनी बांधला होता. त्यामुळेच शाळा सुटताना नेहमीच्या ‘शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली!’ अशी स्थिती न राहता शाळा सुटली अन् पोट भरले, असे सुखद दृश्य अनेक शाळांमध्ये दिसत होते.
शाळेत रडवेल्या किंवा भांबावलेल्या चेहऱ्यांनी प्रवेश करणाऱ्या मुलांना आश्वासक हातांनी वर्गात नेऊन, त्यांचे डोळे पुसत, त्यांना गाणी म्हणून दाखवत, खाऊ खाण्याचे आश्वासन नुसते देऊन नाही तर थोडय़ा वेळात त्यांना खाऊ देऊन अनेक शिक्षिकांनी त्यांना आपलेसे केले. त्यामुळेच शाळांच्या प्रवेशद्वारावर गर्दी करून उभ्या असलेल्या पालकांना एक तासानंतर मुलांचे रडणारे आवाज हसण्यात परावर्तित झाल्याचे सुखद दृश्य दिसले.
मुंबईच्या उपनगरातील अनेक मराठी शाळांनी मराठी सणाचे वातावरण तयार केले होते. रांगोळ्या, पताका लावण्यात आल्या होत्या. चेंबूरच्या सुधामोहन वेर्णेकर प्राथमिक शाळेमध्ये सनई-चौघडे लावण्यात आले होते. मुख्याध्यापिका आणि अन्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना औक्षण केले. खारच्या महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकांनी कठपुतळ्याचे खेळ मुलांना दाखविले तर मोठय़ा मुलांनी नाटुकली सादर करून मुलांना शाळेचे विश्व थोडक्यात दाखविले. बोरिवलीच्या डॉन बॉस्को शाळेमध्ये बालगीतांच्या वातावरणामध्ये प्रवेशोत्सव साजरा झाला. काही शाळांमध्ये पालकांचीही शाळा घेण्यात आली. मुलांना ने-आण करणाऱ्या बसेस कोणत्या आहेत, त्या कुठे थांबणार, मुलांनी कुठे आणि कोणती बस पकडायची आदी सर्व माहिती त्यांना देण्यात येत होती. फोर्टच्या सेंट झेविअर्स शाळेमध्ये आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
अनेक प्राथमिक शाळांनीही मुलांवर शाळेचे दडपण येऊ नये यासाठी केवळ एकच तास शाळा सुरू ठेवली होती. अवघा एकच तास शाळा असल्यामुळे शाळेची भीती मुलांवर राहत नाही, असे काही शिक्षकांचे म्हणणे होते. त्यामुळेच बाहेर पडणारी मुले आईच्या भेटीसाठी रडवेली झाली असली तरी उद्या पुन्हा शाळेत यायची तयारी दाखवत होती. आता त्यांचे आयुष्याचे नवे पाऊल पडले होते.

Story img Loader