ढील दे..कट गई रे..गई बोलो रे धिना..असा सतत कानी पडणारा घोष आणि जोडीला तिळगूळचा गोडवा..काही संस्था व संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘काईट फेस्टिव्हल’ मधील धूम..धार्मिकदृष्टय़ा या सणाचे महत्व लक्षात घेऊन गोदावरीत स्नान करण्यासाठी देशभरातून आलेल्या भाविकांची झालेली एकच गर्दी..
संक्रांतीचे हे विविधांगी रूप नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाहावयास मिळाले. संक्रांत म्हणजे पतंग प्रेमींसाठी जणूकाही दिवाळीच. सकाळपासूनच बच्चे कंपनीसह बडी मंडळीही या सणाचा आनंद घेण्यासाठी गच्ची आणि मैदानात उतरलेले दिसू लागले. दुपारी चारनंतर पतंग उडविणाऱ्यांचा उत्साह अधिकच शिगेला पोहोचला. घराच्या छतावर, पाण्याच्या टाकीवर, जिथून पतंग उडविणे योग्य होईल, अशा सर्व जागा पतंग प्रेमींनी व्यापल्या होत्या. आकाशात सर्वत्र विहरणाऱ्या वैविध्यपूर्ण पतंगींचे साम्राज्य निर्माण झालेले दिसत होते. कुठे कोणाचा पतंग अधिकाधिक उंच जातो, याची स्पर्धा लागलेली तर कुठे आपला पतंग किती उंच जातो यापेक्षा दुसऱ्याचा पतंग कसा कट होईल, याकडे लक्ष देणारे पतंगबाज, एखाद्याची पतंग कटताच ‘कट गई रे’ चा होणारा एकच आवाज, कटलेली पतंग ताब्यात घेण्यासाठी रस्त्यावरील वाहनांची पर्वा न करता धावणारी मुले, असे दृश्य सर्वत्र दिसत होते. शहरातील गजबजाटापासून दूर पतंग प्रेमींना निर्धोकपणे पतंग उडविण्याचा आनंद घेता यावा म्हणून मेट भुजबळ नॉलेज सिटी तसेच सावाना अ‍ॅग्रो फॉर्म यांच्या वतीने काईट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. भुजबळ नॉलेज सिटीतील फेस्टिव्हलचा आनंद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अधिक प्रमाणात घेतला तर, दहेगाव येथे वालदेवी धरणाजवळ सावाना अ‍ॅग्रोच्या वतीने आयोजित मकर संक्रांती फेस्टिव्हलमध्ये सहकुटुंब आनंद घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. संक्रांत आणि येवला यांचे विशेष नाते. या दिवशी येवल्यातील घर अन् घर पतंग उडविण्याचा आनंद घेण्यात मश्गुल असते. यंदाही हेच दृश्य दिसले. येवल्यातील पतंगबाजांचा उत्साह वाढविण्यासाठी पारंपरिक ‘हलकरी’ या वाद्यावर पडणारी थाप, घूमणारा आवाज, त्यामुळे एक आगळेच उत्साही वातावरण तयार होत होते.
पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजामुळे उडणाऱ्या पक्ष्यांना तसेच दुचाकी वाहनधारक व पादचाऱ्यांना होणारा धोका लक्षात घेऊन यंदा नाशिक जिल्ह्यात नॉयलॉन मांजा वापरणे व विक्रीवर बंदी घालण्यात आली. तरीही सर्रासपणे या मांजाची विक्री आणि वापर होत असल्याचे दिसून आले. नॉयलॉन मांज्यामुळे दुचाकी वाहनधारकांना अपघात होण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडले.
संक्रमण पर्वात गोदावरीत स्नान करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून पर्यटकांना घेऊन आलेल्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने गोदातटी वाहन उभे करण्यासही जागा नसल्याचे सकाळच्या वेळी दिसून आले. त्यामुळे काही वाहने नवीन भाजी बाजार परिसरात उभी करण्यात आली होती. पर्यटकांनी गोदावरी स्नानासह परिसरातील सीतागुंफा, कपालेश्वर, काळाराम, या मंदिरांसह तपोवन परिसरातही हजेरी लावली.
गुजरातजवळ असणाऱ्या नंदुरबार आणि मध्य प्रदेश जवळ असणाऱ्या धुळे, जळगाव जिल्ह्यातही संक्रांतीची धूम पाहावयास मिळाली.
नॉयलॉन मांजा विक्रेत्यांविरूध्द कारवाई
बंदी असूनही नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरूध्द सरकारवाडा पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली. नाशिकमधील मेनरोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरातील अनेक विक्रेत्यांकडून नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला. सायंकाळी उशिरायपर्यंत ही कारवाई सुरू होती. संक्रांतीच्या अवघे काही दिवस आधी जिल्हा प्रशासनाने बंदी जाहीर केली. ती त्याआधीच जाहीर केली असती तर आम्ही नॉयलॉन मांजा विक्रीसाठी आणलाच नसता. परंतु आता मोठय़ा प्रमाणावर नॉयलॉन मांजा खरेदी केल्याने त्याची विक्री करू द्यावी, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader