केवळ विद्यार्थ्यांच्या नव्हे, तर प्राध्यापकांच्या ज्ञानातही वाढ होण्याच्या हेतूने येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या प्राध्यापक प्रबोधिनींतर्गत आयोजित व्याख्यानमालेत मान्यवरांनी हजेरी लावली. या व्याख्यानमालेमुळे वैविध्यपूर्ण विषयांवरील विचार ऐकावयास मिळाल्याची प्रतिक्रिया प्राध्यापकांनी व्यक्त केली.
प्रबोधिनीचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. शं. क. कापडणीस यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्देश स्पष्ट करताना प्रबोधिनीमुळे प्राध्यापकांच्या ज्ञानात भर पडून आंतरशास्त्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. व्याख्यानमालेत प्रथम पुष्प प्रा. अमोल तिसगे यांनी ‘मेडिटेशन: आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर गुंफले. मन शांत, स्थिर व एकाग्र होण्यासाठी ध्यानयोग क्रिया किती महत्त्वपूर्ण असते हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. दुसरे पुष्प प्रा. सुनील सौंदाणकर यांनी ‘अँटिबायोटिक्स: डूज अॅण्ड डोण्टस्’ या विषयावर गुंफले. मानवी जीवनात प्रतिजैविकांचा वापर कमी करावा, असा इशारा त्यांनी दिला. प्रा. बी. जे. शेवाळे हे या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रा. डॉ. दत्तात्रय फलके यांनी ‘लोकमानसातील तुकाराम’ या विषयावर मत मांडताना तुकाराम महाराज दिंडी, कीर्तनाद्वारे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. या प्रसंगी ज. ल. पाटील यांनी संत साहित्य समाजाला मार्गदर्शक असल्याने त्याचे सतत चिंतन करण्याची गरज व्यक्त केली. प्रा. शं. क. कापडणीस यांनी ‘रसिका आवडे विनोद’ या विषयावर बोलताना विनोद हा मानवी व्यवहारातील विसंगती व व्यंग दाखवून हसविण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. विनोद केवळ हसविण्यास नव्हे, तर जगायला शिकवितो. अनेक प्रसंगी व परिस्थितीत कसे विनोद निर्माण होतात हे आपल्या खुमासदार शैलीत त्यांनी मांडले. या वेळी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी मानवी जीवनात कसे सहजपणे विनोद घडून येतात याची उदाहरणे दिली.
पाचवे पुष्प ‘असं नाटक असतं राजा’ या विषयावर गुंफताना प्रा. बी. जे. शेवाळे यांनी नाटक हा वाङ्मयातील आकृतिबंध असून जीवनाचे वास्तव दर्शन नाटकातून घडविले जात असल्याचे सांगितले. या वेळी डॉ. दिलीप शिंदे यांनी विद्यार्थिदशेत केलेल्या नाटकांच्या आठवणी सांगितल्या. प्रा. प्रितेश काळण यांनी ‘सर्पसंवर्धन व संरक्षण’ या विषयावर मत मांडताना सापांबद्दल जनमानसात अनेक गैरसमज व अंधश्रद्धा असल्याचे सांगितले.
सातवे पुष्प गुंफताना प्रा. शेलार यांनी ‘चार्वाक: विचार आणि परंपरा’ या विषयावर विचार मांडले. वेदप्रामाण्य नाकारणाऱ्या या नास्तिक विचारवंताने भारताच्या इतिहासात कशी ओळख निर्माण केली हे त्यांनी पटवून दिले.
या प्रसंगी प्रा. एस. एस. गुंजाळ यांनी विवेकवाद व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक प्रबोधिनी प्रमुख प्रा. डॉ. सुरेखा पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. एस. गुंजाळ, प्रा. डॉ. दत्तात्रय फलके यांनी केले.
व्याख्यानमालेमुळे प्राध्यापकांचे प्रबोधन
केवळ विद्यार्थ्यांच्या नव्हे, तर प्राध्यापकांच्या ज्ञानातही वाढ होण्याच्या हेतूने येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला
First published on: 14-12-2013 at 03:47 IST
TOPICSप्राध्यापक
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enlightenment in professors through lecture series