पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासून निकाल जाहीर करण्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी मंगळवारी सांगितले. छायाप्रती मागवलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ज्यांनी छायाप्रती मागितलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले.
अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्यातील त्रुटी सोमवारी उघड झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मागवल्या होत्या. त्या छायाप्रतींनुसार अनेकांच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासलेल्या आढळल्या.अशा छायाप्रती विद्यार्थ्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सोमवारी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या छायाप्रतींनुसार उत्तरपत्रिकेतील प्रश्न न तपासणे, काही प्रश्नांचे गुण एकूण गुणांमध्ये वगळणे, काही उत्तरपत्रिकांमध्ये तर विद्यार्थ्यांनी न  सोडवलेल्या प्रश्नांना गुण देणे, सोडवण्यात आलेले प्रश्न न तपासणे असे अनेक घोटाळे उघड झाले होते. मुख्य निकालाआधी उत्तरपत्रिका अर्धवट तपासल्या होत्या. मात्र, पुनर्मूल्यांकन करताना आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती उपलब्ध करून देतानाही त्या तपासल्या नसल्याचे उघड झाले होते. याबाबत जोशी म्हणाल्या, ‘‘ ही चौकशी समिती फक्त या प्रकरणाचाच नाही, तर अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत असलेल्या सर्वच अडचणींचा विचार करेल. उत्तरपत्रिका मुळात तपासण्यामध्ये निष्काळजीपणा झाला. त्यानंतर पुनर्मूल्यांकन करतानाही पुन्हा तेच घडले. या प्रकरणामध्ये मुळात अर्धवट उत्तरपत्रिका तपासणाऱ्या आणि त्यानंतर पुनर्मूल्यांकनामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या शिक्षकांवर आणि मॉडरेटरवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत पुढे येऊन बोलणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. या प्रकरणाच्या चौकशी बरोबरच अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये येणाऱ्या इतर अडचणींचाही ही समिती अभ्यास करणार आहे. निकाल जाहीर होण्यासाठी लागणारा वेळ, पुनर्मूल्यांकनासाठी वाढणाऱ्या अर्जाची संख्या अशा बाबींवरही ही समिती अहवाल देईल. त्यानंतर सुधारणांच्या दृष्टीने आणि दोषींवर कारवाईच्या दृष्टीने पावले उचलली जातील.’’       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा