पिंपरी  पालिकेतील औषध विभागाचे व्यवस्थापक सुहास काकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने चौकशीचे काम पूर्ण केले असून आपला अहवाल आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना सादर केल्याचे समजते. महापालिकेचे वातावरण ढवळून काढलेल्या याप्रकरणात आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
यशवंतराव चव्हाण रुग्णालय, तालेरा व भोसरी रुग्णालयाकरिता आवश्यक असलेले ‘एनएसटी’ मशीन खरेदीसाठी ई-निविदा नोटीस प्रक्रिया सुरू करण्यात आली व खरेदीपूर्वीच त्यात काही आक्षेपार्ह बाबी असल्याचा ठपका ठेवून तत्कालीन प्रभारी आयुक्त अनुपकुमार यादव यांनी काकडे यांना दोषी ठरवले होते. अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर आयुक्त परदेशींनी काकडे यांच्या निलंबनाचे आदेश दिले. नोटीस न बजावता, त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देताच त्यांच्यावर कारवाई झाली. तेव्हा एका निवेदनाद्वारे त्यांनी आपली बाजू आयुक्तांकडे मांडली. त्यातील मुद्दय़ांमध्ये तथ्य वाटल्याने आयुक्तांनी मुख्य लेखापाल भगवान धाडगे व भांडार विभागप्रमुख डॉ. उदय टेकाळे यांची चौकशी समिती नियुक्त केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील पराकोटीला गेलेले हेवेदावे व धंदेवाईक नेत्यांच्या अर्थकारणातून काकडे यांना ‘बळीचा बकरा’ करण्यात आला व खरे सूत्रधार अधिकारी मोकाट राहिले, हे उघड गुपित आहे. फाईली पुढे सरकावण्याच्या विषयावरून राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते नाराज होते. त्यांनी वैद्यकीय विभागातील राजकारणाचा खुबीने वापर करून ही कारवाई घडवून आणणारी परिस्थिती निर्माण केल्याचे बोलले जाते. या प्रकरणात कोणावरही अन्याय होणार नाही तसेच चौकशीत वरिष्ठ अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू, असे आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.