सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्या वडिलांच्या नावाने महाराष्ट्र बँकेच्या लॉकरमध्ये असलेली ३५ लाख रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली. दुसऱ्या लॉकरमध्ये काही आढळले नसले, तरी नांदेड जिल्ह्य़ातल्या त्याच्या स्थावर मालमत्तेची चौकशी सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
सतीश चिखलीकर नांदेड जिल्ह्य़ातला रहिवासी आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी आहेत. लाच घेताना पकडल्यानंतर चिखलीकरच्या संपत्तीची गेल्या आठ दिवसांपासून मोजदाद सुरू आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक-नगर येथील लॉकरची तपासणी केल्यानंतर गुरुवारी रात्री पथक नांदेडात दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक शेख नजीर, पोलीस निरीक्षक श्रीमती चौधरी, नांदेड कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक गजानन सैदाने, नईम हाशमी यांच्या पथकाला सकाळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या तारासिंह मार्केट शाखेत असलेल्या लॉकरमध्ये ३५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. नाशिकच्या पथकाने वामननगर येथील नांदेड जिल्हा बँकेच्या लॉकर्सची तसासणी केली. चिखलीकरच्या पत्नीच्या नावे असलेल्या या लॉकरमध्ये काही आढळले नाही. सन २०१० मध्ये चिखलीकर दाम्पत्याने हे लॉकर घेतले होते. पण त्याचा वापरच झाला नाही. दोन लॉकरची तपासणी केल्यानंतर नाशिक येथील अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नांदेडच्या अधिकाऱ्यांनी स्थावर मालमत्तेचा शोध सुरू केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीकरने कासारखेडा, मालेगावसह अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जमिनी घेतल्या. या संपूर्ण प्रकरणात कारवाई करताना गोपनीयता बाळगणाऱ्या नाशिकच्या पथकाने सायंकाळी उशिरा नांदेड सोडले.

Story img Loader