सांगली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक ही आगामी विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’ असल्याने प्रचारामध्ये चांगलाच रंग भरला असून प्रचारफेऱ्या, कोपरा सभा यांनी वातावरण ढवळून निघत आहे. एक गठ्ठा मताच्या जुळणीसाठी उमेदवार दिवसभराची पायपीट विसरून रात्र-रात्र जागत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी विकास आघाडी यांच्यात सत्तेसाठी चाललेल्या आरोप-प्रत्यारोपामध्ये नागरी समस्यांवर मात्र चर्चाच टाळली जात आहे.
महापालिकेच्या ७८ सदस्यांसाठी दि. ७ जुलै रोजी मतदान होत आहे. उमेदवार निश्चितीनंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. महापालिकेची सत्ता एकहाती यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रिंगणात आपले उमेदवार उतरविले आहेत. तर काँग्रेसनेही महापालिका क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय सिद्धता ठेवली आहे. दोन्ही काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ने कंबर कसली आहे.
गत निवडणुकीवेळी विकास महाआघाडीचा प्रयोग ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडला होता. मतदारांनी दाखविलेला विश्वास श्री. पाटील यांच्या राजकीय इच्छापूर्तीसाठी निर्णायक ठरला. मात्र आघाडीतील एकसंधपणाला शेवटच्या दीड वर्षांत तडे गेले.
काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांची महापालिकेवर सत्ता होती. ही सत्ता संपुष्टात आणून जयंत पाटील यांनी परिवर्तन घडवून आणले. मात्र यासाठी त्यांना भारतीय जनता पक्ष,जनता दल यांचे मिळालेले सहकार्य कारणीभूत ठरले होते. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून सत्तेसाठी एकत्र आलेल्या नेत्यांच्यामध्ये केवळ तीन वर्षांतच बेबनाव निर्माण झाला. त्याचे पर्यवसान महापालिकेतील आघाडीची शकले होण्यात झाले.
हा अनुभव लक्षात घेऊन मंत्री श्री. पाटील यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडय़ाखालीच महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. जुन्या चुका टाळून नव्याने बांधणी करीत त्यांची टीम पुन्हा एकदा परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. स्वत: जयंत पाटील प्रचारासाठी सांगलीत तळ ठोकून आहेत. गल्लीबोळातून राष्ट्रवादीचा प्रचार करत ते फिरत आहेत. त्याच बरोबर पक्षाच्या प्रचारासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याही सभा आयोजित करण्यात आल्या.
भाजपचे आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ निवडणूक रिंगणात आहे. या आघाडीत भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल यांचा समावेश आहे. आघाडीच्या प्रचारासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सभा आयोजित करून प्रचारात रंग आणला आहे.
काँग्रेसने सर्व जागांसाठी उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील, विश्वजित कदम आदी आघाडीवर आहेत. महापालिकेतील सत्ता पुन्हा एकदा काँग्रेसच्या झेंडय़ाखाली आणणे हेच ध्येय घेऊन ही मंडळी रणांगणात उतरली आहेत. या शिवाय शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही आपले उमेदवार मैदानात उतरविले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात नागरी समस्यांवर हल्लाबोल होण्याची अपेक्षा सर्वसामान्य बाळगून आहे. मात्र नेत्यांकडून या अपेक्षांना फारसे महत्त्व दिले जात नाही. वैयक्तिक व पक्षीय आरोपातच महापालिका निवडणूक गुरफटली असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
पिण्याचे शुद्ध पाणी, डासमुक्ती, वाहतुकीचा बोजवारा आणि खुंटलेला औद्योगिक विकास याकडे कोणताही राजकीय पक्ष अथवा नेते गांभीर्याने पाहात असल्याचे दिसत नाही. विस्तारित भागातील रस्ते चिखलानी माखलेले असताना त्यातूनच वाट काढत प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरांवर समस्यांचाही बोजा वाढत आहे. मात्र याची उकल करण्यासाठी कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जात असल्याचे उमेदवार आढळत नाहीत.
महापालिका क्षेत्राचा समावेश असणारे सांगली व मिरज दोन विधानसभा मतदार संघ आहेत. दोन्ही ठिकाणचे नेतृत्व सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक ही विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’ मानली जात आहे. त्यामुळे रथी-महारथींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारफेरीचा टप्पा पार पडल्यानंतर वैयक्तिक भेटीगाठीला जोर येणार असून प्रचारसभांसाठीही स्टार प्रचारकांना आमंत्रित करण्याची तयारी राजकीय पक्षांनी ठेवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा