महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अखेर सोलापूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटांसह सुरू झालेल्या या पावसाने तप्त सोलापुरात गारवा निर्माण झाला. त्यामुळे सर्वानाच दिलासा मिळाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्याचे समाधान असताना आता पावसानेही चांगली साथ द्यावी म्हणून दुष्काळग्रस्त सामान्य शेतकरी व नागरिक वरूणराजाकडे करूणा भाकत आहेत.
मान्सूनचे आगमन काल मंगळवारी जिल्हय़ात काही ठिकाणी झाले. यात करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आदी तालुक्यांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ३७ मिली मीटर पाऊस पडल्याने त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याशिवाय मंगळवेढा (१८), सांगोला (४), करमाळा (२) याठिकाणी कमी जास्त प्रमाणात का होईना पावसाचे आगमन झाल्याचे समाधान सर्वाना वाटत आहे.
बुधवारी सकाळपासून शहरात तापमान कमालीचे वाढले होते. दुपारी तर उष्म्याची तीव्रता चांगलीच जाणवत होती. त्यामुळे पाऊस पडावा म्हणून देव पाण्यात ठेवले होते. सायंकाळी वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांनी गर्दी केली व पावसाच्या आगमनाची चाहूल दिली. त्यानंतर काही वेळातच ढगांच्या गडगडाटात व विजांच्या कडकडाटांसह पावसाला प्रारंभ झाला. वादळी वारेही वाहत होते. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. नंतर या पावसाने मध्मम स्वरूप धारण केले. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनधारकांची तारांबळ उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा