कृष्णा खोरे महामंडळाचे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालय सोलापूर जिल्हय़ातील करमाळा येथील स्थलांतरास स्थगिती मिळाल्याने तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात आला. या कार्यालयातील कर्मचा-यांचीदेखील करमाळा येथे जाण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळे कर्मचा-यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
हे कार्यालय तालुक्यातून गेल्यास तालुक्यातील शेतक-यांचे भूमी अधिग्रहणाचे पैसे मिळणे अडचणीचे ठरले असते. याशिवाय चा-यांची कामेही बंद पडली असती, या चाऱ्यांचे हस्तांतरणही झाले नसते. त्याचे गांभीर्य ओळखून तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्याच्या हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडले. या बैठकीत तालुक्याच्या विकासाला ४५ कोटी रुपयेही जाहीर करण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे म्हणाले, या प्रश्नावर आम्ही पुणे येथे आंदोलन केले, यामुळेच सरकारला या कार्यालयाचे स्थलांतर थांबवावे लागले. तसेच सीना धरणात पाणी सोडण्यासाठीही उपोषण केले, त्याचाही फायदा झाला. सीना धरणात आता पुन्हा ओव्हरफ्लोचे पाणी मिळेल.

Story img Loader