तालुक्यातील बामणी येथे हनुमान मंदिरात दलित महिलांना प्रवेश न देण्याची प्रथा पाळली जात असे. परंतु अनिष्ट रुढीला झुगारून बुधवारी ग्रामपंचायत सदस्या कुमुदिनी कांबळे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हनुमानाच्या मूर्तीवर अभिषेक केला.
या महिलांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारीही गावात आवर्जून उपस्थित होते.
बामणी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २३ ऑक्टोबरला जाहीर झाला. ९ सदस्य मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आले. यात अ‍ॅड. गणपत कांबळे व त्यांच्या पत्नी कुमुदिनी कांबळे यांचा समावेश होता. विजयानंतर सर्व सदस्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंदिराजवळ गेल्यानंतर कांबळे दाम्पत्य बाहेरच थांबले.
मंदिरात मागासवर्गीयांनी प्रवेश करायचा नाही, अशी अनिष्ट प्रथा गावकरी पाळायचे. अन्य सदस्यांनी आग्रह केला म्हणून कांबळे दाम्पत्यानी हनुमान मंदिरात प्रवेश केला आणि ग्रामदैवतेचे दर्शन घेतले. त्यानंतर काही माथेफिरूंनी त्यांना मारहाण केली.
 ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला गेला. त्यानंतर या संबंधीची पोलिसांत तक्रारही देण्यात आली. मात्र, गावात अनिष्ट प्रथा सुरूच होती.
 हा प्रश्न राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी हाती घेतला आणि मंदिरात प्रवेश करून अभिषेक करण्याचे जाहीर केले. आज कुमुदिनी कांबळे व महिला कार्यकर्त्यांनी या अनिष्ट प्रथेला आळा घालण्याचे ठरविले.
उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, पोलीस अधिकारी वैशाली कडुकर, तहसीलदार अभिजित पाटील आदींनी यासाठी पाठिंबा दिला. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहूमहाराज आणि महात्मा फुले यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा