एरवी कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रदुषणाविषयी कंठशोष करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धन करता येईल का,पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल या उद्देशाने आजची युवापिढी काय काम करत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न येथे आयोजित दुसऱ्या वेध परिषदेच्या निमित्ताने होणार आहे. पर्यावरणासह विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या काही ‘रोल मॉडेल’चा यावेळी परिचय करून दिला जाणार आहे. त्यात पाण्याच्या दर्जाचे संशोधन करणारा भारतीय शास्त्रज्ञ रोहन शेट्टी, मानवी वस्तीत भय निर्माण करणाऱ्या बिबटय़ांना शांत करणारी पशुवैद्यक विनया जंगले यांसह इतरांचा समावेश आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या इन्स्टिटय़ुट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ व संवेद या संस्थेच्यावतीने रविवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात वेध या व्यवसाय प्रबोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद नाशिककरांच्यादृष्टीने पर्यावरण क्षेत्रात वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या तज्ज्ञांची भेट घडविणारी ठरणार आहे. परिषदेत सहभागी होणारे भारतीय शास्त्रज्ञ रोहन शेट्टी हे त्यापैकीच एक. सध्या ते समुद्र जीवांचे संशोधन आणि संवर्धन यावर काम करीत आहेत. भूगर्भशास्त्रात शिष्यवृत्ती प्राप्त करून ते जर्मनी येथे पीएचडीही करत आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी थेम्स नदीच्या पाण्याच्या दर्जाचे नियंत्रण व संशोधन केले. तसेच भूमध्य समुद्रातील माल्टा या देशात समुद्राचा जमिनीवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास सुरू आहे. स्वीडन, डेन्मार्क, पोलंड, इटली या राष्ट्रात मातीच्या अभ्यासात ते गुंतले होते. सध्या ते उत्तर ध्रुवावरील पर्यावरणाचे ‘मॅथॅमेटिकल मॉडेल’ करण्याच्या प्रक्रियेत मग्न आहेत. विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या रोहन यांनी महाराष्ट्रातील ताम्हणी घाटातील देवराई वन्यजीवांसह तेथील वनराईचा थेम्स नदीच्या पाश्र्वभूमीवर अभ्यास हाती घेतला आहे. भूगर्भशास्त्र, अत्याधुनिक विज्ञान आणि समुद्राचे पाणी या त्रिसूत्रीवर काम करताना त्यांनी योगविद्या आत्मसात केली. तसेच संगीताचा अभ्यासही सुरू ठेवला.
मान्यवरांच्या यादीतील दुसरे नाव पशुवैद्यक विनया जंगले यांचे. चिपळूण येथे त्या सध्या पशूवैद्यक म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी मुंबई येथील नॅशनल पार्कमध्ये त्या कार्यरत होत्या. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी वन्यजीव संवर्धनास प्रथम प्राधान्य दिले आहे. मुंबईत नागरी वस्तींमध्ये होणारा बिबटय़ाचा धुमाकुळ असो, वा कर्नाटक-महाराष्ट्र या वादग्रस्त हद्दीवर सुरू असलेला हत्तींचा धुडगूस असो. या विषयांवर नियोजनबध्द काम केल्यामुळे महत्वपूर्ण वन्यजिवांचे संरक्षण करण्यात सरकारला काही अंशी यश आले. मानवी वस्तीत घुसलेल्या बिबटय़ा, हत्ती यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका न पोहचू देता त्यांना बेशुध्द करून प्राणी संग्रहालयात सुरक्षित सोडण्याची जबाबदारी, यातील आव्हाने त्यांनी सक्षमपणे पार पाडली आहेत. ‘वन्यजीव संवर्धन’ हे ध्येय घेऊन काम करणाऱ्या जंगले यांनी त्याबाबत प्रबोधन करण्यासाठी लेखनही केले आहे. त्यांचे मार्गदर्शन नाशिककरांच्यादृष्टीने महत्वाचे आहे. शहरात अनेकदा बिबटय़ाने धुमाकूळ घालण्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकेल. या व्यतिरिक्त ग्रामीण डाटाबेसवर आधारीत उद्योग उभा करणारे प्रदिप लोखें, तरूण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करणारी मुक्ता पुणतांबेकर, अ‍ॅनेमिया या प्रश्नावर तोडगा म्हणून सुई न टोचता हिमोग्लोबिन मोजणारे तंत्र विकसित करणारा अभिषेक सेन आणि ई-डिक्शनरी तयार करणारे सुनील खांडबहाले या मान्यवरांचाही समावेश आहे.
प्रसिद्ध लेखक व मानस रोगतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी या मुलाखती घेणार आहेत. देशातील तरूण आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. तरूणांपुढे त्यांना आणून त्यांच्या पुढील करिअरबाबत विचार करायला लावणे, प्रेरीत करणे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात येते. या संदर्भात अधिक माहितीसाठी व प्रवेशिकेसाठी हेल्थ व्हीव, मनोवेध, दुसरा मजला, बिझनेस सेंटर, दिव्या कलेक्शनच्या वरती, शास्त्रीपथ, नाशिक रोड किंवा मनीमॅटर, शॉप नं. ४, गंगालिला अपार्टमेंट, पाटील लेन नं. ३, कॉलेज रोड  नाशिक येथे संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा