निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण स्नेही गणेशाची अनोखी कल्पना राबविण्याचा येथील प्रेरणा प्रतिष्ठानचा उपक्रम केवळ स्तुत्यच नव्हे तर तेवढाच प्रेरणादायी असून हा पॅटर्न आम्ही संपूर्ण जिल्ह्य़ात राबविणार असल्याचे खासदार संजीव नाईक तसेच खासदार आनंद परांजपे यांनी येथे बोलताना सांगितले.
प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे मावळी मंडळाच्या सभागृहात आयोजित पर्यावरण स्नेही गणेश प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडू माती आणि कागदाचा लगदा यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकारातील गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची सचित्र माहितीही देण्यात आली होती. तीन दिवस झालेल्या या उपक्रमाला ठाणेकर नागरिकांनी भेट देऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्हीही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
आजपर्यंत ठाणे परिसरामध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिस या घातक मूर्तीचीच मोठय़ा प्रमाणात प्रतिष्ठापणा करण्यात येते. पण शाडू माती व कागदाचा लगदा तसेच नैसर्गिक रंगात असलेल्या मूर्ती कोठेही मिळत नाहीत. यासाठी प्रेरणा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन ही अनोखी चळवळ हाती घेतली आहे, असे नमूद करून संजीव नाईक म्हणाले, यापुढे ही चळवळ जिल्ह्य़ातील विविध पालिका तसेच महापालिका क्षेत्रामध्ये पोलीस तसेच प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येईल. या संदर्भात संबधितांची लवकरच एक बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी  सांगितले.
प्रारंभी प्रेरणाचे अध्यक्ष किरण कुलकर्णी व सचिव मनोज दिघे यांनी नाईक तसेच परांजपे यांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा