प्रदूषणाला वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर असावे, म्हणून ते वाचविण्याची जबाबदारी सर्वाचीच आहे, असे विचार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप विभागीय अधिकारी एस. एस. गाढवे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘इको फ्रेंण्डली घरचा गणपती सजावट’ स्पर्धेतील विदर्भातील विजेत्यांना ‘लोकसत्ता’च्या ग्रेट नाग रोडवरील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गाढवे बोलत होते.
व्यासपीठावर ‘लोकसत्ता’चे महाव्यवस्थापक (वितरण-पश्चिम) मंगेश ठाकूर, उपमहाव्यवस्थापक (स्पेस मार्केटिंग) बद्रुद्दीन ख्वाजा, विदर्भ ब्युरो चीफ विक्रम हरकरे व मुख्य वितरण व्यवस्थापक वीरेन्द्र रानडे उपस्थित होते. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
पर्यावरणाबाबत जागृती व्हावी आणि प्रदूषण कमी व्हावे, या उद्देशाने राज्यभर हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगून मंगेश ठाकूर यांनी ‘इको फ्रेंण्डली घरचा गणपती सजावट’ स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत जवळपास ९५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातून दहा विजेत्यांची निवड करण्यात आली. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. यात अजय कारवा (अमरावती) व मेघा चांदे (चंद्रपूर) यांना अनुक्रमे पहिले (दहा हजार रुपये) व दुसरे (सात हजार रुपये) पारितोषिक देण्यात आले. अजित गर्गे (खामगाव), अभिषेक शंखपाळे (नागपूर), रेणुका भाले (अकोला), सुरेश कावळे (नागपूर), धीरन मेश्राम (नागपूर) यांना प्रोत्साहनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या उपक्रमातून आम्हाला प्रोत्साहन मिळाले. अशा उपक्रमाच्यानिमित्ताने सजावट केल्यामुळे स्पर्धकांच्या कलेला आणि कल्पकतेला वाव मिळतो. अशा उपक्रमांमध्ये लोकांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग वाढावा, अशा शब्दात स्पर्धेतील विजेते सुरेश कावळे मनोगत व्यक्त केले.
हा उपक्रम छान आहे. तालुका पातळीपर्यंत ही स्पर्धा घेण्यात आल्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांमध्ये चांगली जागृती झाली आहे, अशी प्रतिक्रिया रमेश दत्तात्रेय गर्गे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन वितरण उपव्यवस्थापक ज्ञानेश्वर महाले यांनी तर आभार मुख्य वितरण व्यवस्थापक वीरेन्द्र रानडे मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा