शालेय अभ्यासक्रमात ‘पर्यावरण’ विषय अनिवार्य करण्यात आला असला तरी कागदोपत्री अहवालापलीकडे पर्यावरणप्रेमी शिक्षण संस्थांची मजल गेलेली नाही. या पाश्र्वभूमीवर, निसर्ग आणि विद्यार्थ्यांची नाळ जुळावी यासाठी पर्यावरण विभागाद्वारे ग्रामीण भागातील शाळांमध्ये दोन वर्षांपासून पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. शासन, ग्रामपंचायत आणि विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून आज गांडूळखत, फुलपाखरू उद्यान, औषधी वनस्पतींपासून उत्पादन असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण विभागाने या उपक्रमाची दखल घेऊन शाळा आणि शिक्षकांचा सृष्टी मित्र पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
राज्यातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी या सहा महसूल विभागात ही योजना सुरू आहे. त्या माध्यमातून सहभागी शाळांमध्ये आठवडय़ातील एक दिवस निवडून शाळेच्या नियमित तासांव्यतिरीक्त तीन तास प्रत्यक्ष कृतीवर आधारीत पर्यावरण संवर्धन कृती कार्यक्रम राबविणे अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात सटाणा, दिंडोरी आणि निफाड तालुक्यात पहिल्या टप्पात ११ आणि दुसऱ्या टप्प्यात १० अशा एकूण २१ शाळांनी सहभाग नोंदविला. शाळेने पाणी, ऊर्जा, घनकचरा, जैवविविधता, प्रदूषण व संस्कृती आणि वारसा यापैकी एका विषयावर ठोस उपक्रम राबवावा. यासाठी सर्वेक्षण, स्थानिक समस्या, त्याची व्याप्ती याचा विचार करत प्रकल्पाची आखणी करावी असे अभिप्रेत आहे. यानुसार सटाणा तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने दोन वर्षांपूर्वी शाळेत घनकचरा विषयावर आधारीत गांडूळखत प्रकल्पाची आखणी केली. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एका मोकळ्या जागेत गावातील संपुर्ण कचरा संकलित करत गांडूळखत निर्मिती सुरू केली. या खताचा शाळेच्या आवारातील वृक्षांसाठी उपयोग होतो तसेच शेतकऱ्यांना लाभ होत आहे. गावातील खराब इलेक्ट्रॉनिक वस्तु एकत्रित करत तिचे योग्य पध्दतीने विल्हेवाट लागावी, जेणेकरून कोणाला काही आजार होऊ नये यासाठी एका संस्थेला काम देण्यात आले आहे. याच धर्तीवर ‘बायोवेस्टे’साठी पुढील शैक्षणिक वर्षांत नवीन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांनी खराब कपडय़ाच्या पिशव्या तयार करत ५०० हून अधिक पिशव्यांचे वाटप करत प्लास्टिक मुक्त गावाकडे पाऊल टाकले आहे. या शिवाय वर्षभर शाडू मातीचा गणपती कार्यशाळा, निर्माल्यातून कंपोस्ट खत, पर्यावरणपूरक दिवाळी आदी उपक्रम अव्याहतपणे सुरू आहेत.
दिंडोरी तालुक्यातील कोऱ्हाटे येथील जनता विद्यालयात विद्यार्थ्यांना जैवविविधतेचा अभ्यास करता यावा यासाठी शाळेने स्वतच्या जागेत ‘फुलपाखरू उद्यान’ तयार केले आहे. या संपुर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी शेड बांधण्यापासून फुलपाखरांना खाद्य पुरविणाऱ्या वनस्पतीची लागवड, त्याची देखरेख आदी कामे केली. यामुळे फुलपाखराच्या तीन अवस्था मुलांना जवळून अभ्यासता आल्या. आज फुलपाखरू उद्यानात पाच प्रजाती आहेत. तसेच आयुर्वेदीक औषधी वनस्पती उद्यानही तयार करण्यात आले आहे. या जागेवर औषधी वनस्पतीची लागवड करत त्यातून मुलांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी विविध औषधी उत्पादने कसे करता येतील याविषयी मार्गदर्शन केले जाते. अडुळसापासून खोकल्याचे औषध, आवळ्याचे सरबत अशी छोटी उत्पादने विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. नुकतेच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. निफाडमधील सात गावांचा पर्यावरणीय अभ्यासावर सर्वेक्षण झाले असून नवीन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाने या उपक्रमांची दखल घेत सटाणा तालुक्यातील आसखेडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि प्रकल्प संयोजक जे. एन. ठाकरे यांना सृष्टीमित्र पुरस्काराने गौरविले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यासपीठ
शहरात पर्यावरणाचा जागर कायम असला तरी ग्रामीण भागात तुलनेत पर्यावरण किंवा त्या संबंधित विषयाला तुलनेत कमी महत्व दिले जाते. राज्य सरकारने ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाचा जागर व्हावा यासाठी पर्यावरण सेवा योजनेची आखणी केली. ग्रामीण भागातील मुलांची निसर्गाशी जुळलेली नाळ अधिक घट्ट व्हावी, मात्र हे करताना त्यांना पर्यावरणाचे विविध पैलु समजावे त्यांच्या सृजनतेला वाव मिळावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.
– जगदीश ठाकूर
(प्रकल्पाधिकारी, नाशिक विभाग)
चारुशीला कुलकर्णी, नाशिक