पर्यावरण हा वैकल्पिक विषय न समजता त्याला अनिवार्य समजायला हवे आणि त्याला अनुरूप आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी केले आहे. तालुक्यातील जवखेडा येथे जय श्रीकृष्ण कृषी पर्यटन केंद्रातर्फे नंदुरबार जिल्हा आयकॉन्स स्नेहमिलन, विचार मंथन व पर्यावरण दिन अशा त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी ‘महात्मा गाधी तंटामुक्त गाव-जवखेडा’ या प्रवेशद्वाराचे उद्घाटन डॉ. अपरांती यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
पर्यावरण संवर्धनासाठी लोकांना प्रोत्साहित करायला हवे, लोकसंग्रह विधायक कार्यक्रमासाठी उपयोगात आणायला हवा. संपूर्ण देशात अशी चळवळ सुरू झाल्यास देशाचे चित्र बदलू शकेल. पोलीस दलात राहून आपण पर्यावरण संवर्धनाचे काम करीत असल्याने यानिमित्ताने पोलिसांची प्रतिमा बदलली, असेही ते म्हणाले. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी कोळदा येथील डॉ. हेडगेवार समिती कृषी विकास केंद्राचे विश्वस्त प्राचार्य रंगनाथ नवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अनिल भंडारी, तहसीलदारांसह जिल्हा कृषी अधीक्षक अशोक कांबळे, कोळदा कृषी विकास केंद्राचे अध्यक्ष कृष्णदास पाटील आदी उपस्थित होते.
पर्यावरण ही औपचारिक चळवळ न राहता ती अनौपचारिक व्हायला हवी, तरच या चळवळीला बळ मिळेल. गेल्या वर्षी पोलिसांनी ११ हजार झाडे लावली. यंदाही मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करावयाचे असल्याने स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्यात आली असल्याची माहितीही डॉ. अपरांती यांनी दिली. जिल्हा कृषी अधीक्षक अशोक कांबळे यांनी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हेक्टर जमीन जंगलाखाली असून सध्या जंगल कमी होत चालल्याने दरवर्षी एक कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जंगलाबरोबर मातीचाही ऱ्हास होत चालला आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन तसेच पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम व्यापक करून ती संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याची आवश्यकता कांबळे यांनी मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ नवले यांनी पहिल्या पिढीने शेतकरी म्हणून पर्यावरण सहभाग नोंदवला आहे, तर दुसरी पिढी तटस्थ दिसून येते, असे मत मांडले. पर्यावरण हे माणसावरच अवलंबून आहे. त्यासाठीच ‘आयकॉन’ महत्त्वाचे ठरतात. पर्यावरणासाठी आयकॉन्सची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक संभू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले.
नंदुरबारमध्ये वृक्षारोपण
पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवड व संवर्धन ही शासनाची जबाबदारी असली तरी त्याकरिता समाजातील प्रत्येक व्यक्तीचा व्यापक सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत बकोरिया यांनी या वेळी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, साहाय्यक जिल्हाधिकारी सुमन रावत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सु. दे. वाढई आदी उपस्थित होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोठय़ा प्रमाणात रोपे तयार करण्यात आली आहेत. नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, तळोदा येथील रोपवाटिकेमध्ये रोपे उपलब्ध असून ती मोफत पुरविण्यात येणार आहेत. यासाठी नजीकच्या लागवड अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक वाढई यांनी याप्रसंगी केले.