गुढी पाडवा अर्थात हिंदु नववर्षांचे स्वागत यात्रांच्या माध्यमातून करताना यंदा प्रथमच जल संवर्धन व पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. गुरूवारी पहाटे साडे सहा वाजता शहरातील विविध भागातून स्वागत यात्रांना प्रारंभ होणार आहे.
या बाबतची माहिती नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. गंगापूर रोड परिसरातील नववर्ष स्वागत यात्रेला नरसिंगनगर येथील मारूती मंदिर, महात्मानगर येथील यात्रा बस थांब्यासमोरून, तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, संभाजी चौकातील यात्रा लवाटेनगरमधील महालक्ष्मी मंदिर, कॉलेज रोडवरील यात्रा योग विद्याधाम केंद्रापासून सुरू होईल. या सर्व नववर्ष स्वागत यात्रा सकाळी साडे आठच्यासुमारास कॉलेजरोडवर एकत्रित होऊन त्यांचा समारोप होणार आहे. संपूर्ण यात्रा मार्गावर रांगोळ्या काढण्यात येणार आहे. श्री महिला मंडळाच्यावतीने स्त्री भ्रुणहत्येवर पथनाटय़ाचे सादरीकरणही केले जाणार आहे. ठिकठिकाणी मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर केली जातील. विशेष सायकलस्वारांचे पथक सहभागी होऊन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींचा लक्षणिय सहभाग, हे या यात्रांचे वैशिष्ठय़े राहील. लेझिम पथकाबरोबर झाशीची राणी, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आदींच्या वेशभूषा विद्यार्थी साकारणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत यात्रेचे प्रमुख लक्ष्मीकांत जोशी, अभिनेता अभिजित खांडकेकर उपस्थित राहणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी समन्वय समिती, चित्ररथ, प्रचार व प्रसार, प्रसाद, रांगोळी, वेशभूषा आदी समित्यांची तयारी पूर्णत्वास गेली आहे. नववर्ष स्वागत यात्रांमध्ये नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष के. जी. मोरे, उपाध्यक्ष देवदत्त जोशी आदींनी केले आहे.
दरम्यान, लायन्स क्लबच्यावतीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता शासकीय कन्या शाळेत सेवाकार्याची गुढी उभारली जाणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित राहणार आहे. कन्या शाळेचे वसतीगृह चालविण्याची हमी कार्यक्रमात दिली जाणार असल्याचे उपप्रांतपाल डॉ. विक्रांत जाधव यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा