ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांनी पट्टेदार वाघाला अक्षरश: घेरून ठेवल्याचा सचित्र वृत्तांत ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाल्यानंतर पर्यटकांच्या व्याघ्रदर्शनाच्या अतिहव्यासावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पर्यटकांच्या जिप्सीने घेरलेला वाघ जंगलात स्वत:साठी वाट शोधत असल्याच्या छायाचित्रानंतर दोन गाईड आणि दोन जिप्सी चालकांवर ताडोबा-अंधारी प्रकल्प व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न चालविला असला तरी अशी आणीबाणीची परिस्थिती का, उद्भवली, याचा पर्यटक आणि प्रकल्प व्यवस्थापनाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे.
सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर रिठे म्हणाले, ताडोबात वाघांच्या दर्शनाची अपूर्व संधी चालून आल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने येणारच आहेत आणि स्थानिक रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वन खाते आणि स्थानिकांना मोठा महसूल मिळवून देणारा एकमेव प्रकल्प आहे. वनसंवर्धन आणि व्याघ्र संवर्धनाच्या योजना राबविल्याच्या प्रयत्नांचे फळ म्हणून ताडोबातील वाघांची संख्या वाढली असून उन्हाळ्याच्या दिवसात वाघ बाहेर पडू लागल्याने त्यांचे पर्यटकांना दर्शन घडत आहे. परंतु, जंगलभ्रमण हा पिकनिकला जाण्यासारखा विषय नाही. जंगलवाचन अत्यंत शिस्तीत आणि शांततेत करावे लागते, याचे भान पर्यटकांनी ठेवणे आवश्यक आहे.
पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे स्थानिक प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाने तयार केलेल्या नियमावलीतील शर्ती तंतोतंत पाळे शक्य नाही तरीही प्रकल्प व्यवस्थापनाने पर्यटक आणि गाईड यांना समुपदेशन करून त्यांना जंगलभ्रमणाचे नियम समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे. दोन जिप्सींमधील अंतर दहा फूट तरी असले पाहिजे. जंगलात सफारी करणाऱ्या जिप्सींसाठी ते शक्य नसले तरी किमान बेसिक नियम पाळले गेलेच पाहिजेत. आता जंगलातील रस्ते ‘वन वे’ करायचे वा ‘टु वे’ याचा निर्णय प्रकल्प व्यवस्थापनाला घ्यायचा आहे. त्यांची जबाबदारी ते पार पाडत नाही, हा आक्षेप चुकीचा आहे कारण, बेशिस्त जिप्सी चालक आणि गाईड्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
काहीप्रसंगी गाईड वा जिप्सी चालकांवर पर्यटक दबाव टाकून गाडी आत घेण्यास भाग पाडतात. हा प्रकारच चुकीचा आहे. त्यांच्या बरोबरच शिस्तभंग आणि नियमभंग करणाऱ्या पर्यटकांवरही कारवाई केल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही, असेही रिठे यांनी सांगितले.
सीएसी ऑलराऊंडरचे संस्थापक संचालक व प्राणी बचावाच्या अनेक मोहिमा फत्ते करणारे अमोल खंते म्हणाले, जंगलभ्रमण म्हणजे पिकनिक नाही, याची जाणीव पर्यटकांनी ठेवणे आवश्यक आहे. वाघ हा काही पाळीव प्राणी नाही. त्याची छायाचित्रे घेण्यासाठी थेट जिप्सी जंगलाच्या आत घालणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणे आहे. मध्य प्रदेशातील कान्हात वाघाने पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना ताजीच आहे. त्यापासून पर्यटकांनीच धडा घ्यावा. गाईड आणि जिप्सी चालकांनाही शिस्त लावण्याची गरज असून अतिउत्साही पर्यटकांच्या दबावाखाली काम न करता त्यांनी नियम पाळले पाहिजेत.
ज्येष्ठ वनअभ्यासक व पक्षीतज्ज्ञ डॉ. अनिल पिंपळापुरे म्हणाले, सध्या ज्या प्रकारचा ‘टुरिझम’ विदर्भात सुरू आहे, त्याकडे पाहता असे प्रकार घडणारच आहेत. व्याघ्र केंद्रित वन पर्यटनामुळे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. यात पर्यटकांना दोष कसा देता येईल? कारण, तुम्ही पर्यटकांना आत सोडाल तर त्यांना वन्यप्राण्यांचे दर्शन होणे साहजिकच अपेक्षित राहील. यासाठी जंगलभ्रमणाचे नियम सर्वाना समजावून सांगून पर्यटकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा