गेले पंधरा ते वीस दिवस लक्षावधी वारकरी भक्त यांनी पंढरपूरनगरी गजबजून गेली होती आता ही गजबज पूर्णपणे संपली असून पंढरीतील सर्वच दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. पंढरीतील घरटी दोन -तीन माणसे ताप, खोकला थंडीने आजारी आहेत.
यात्रा काळात ऐन एकादशी, द्वादशी या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वत्र चिखल, पडलेली घाण, कचरा आहे त्या ठिकाणी कुजला. कचरा कुडय़ांतून कचरा, शिळे अन्न टाकल्याने दुर्गंधी आज ही काही भागात आहे. पावसाच्या उघडिपीनंतर युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. ज्या पद्धतीने स्वच्छता होणे गरजेचे होते, तेवढे झाले नाही. ती होणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक घरटी काही व्यक्ती ह्य़ा थंडी, ताप, खोकला यांनी आजारी असून दवाखाने रुग्णाने गच्च भरलेले आहेत. थंडी, ताप, खोकला हे सर्रास होणारे त्रास परंतु काही डॉक्टर हे या संधीचा फायदा उठवत रक्त, युरीन, तपासणी करून घेण्यास रुग्णाना सांगत आहेत.
सध्या पंढरीत माश्यांचा प्रादुर्भाव वाढला असून हे संसर्गजन्य रोगाला ते आमंत्रणच देणारे आहे. या माशांचा नायनाट करणेही गरजेचे आहे. पंढरीतील वारकऱ्यांची वारी संपली असून स्थानिकांची दवाखाना वारी चालू झाली आहे.

Story img Loader