थंडीतील धुके आणि त्यात पावसाची रिमझिम हे वातावरण कितीही आल्हाददायी वाटत असले तरी त्याचे दुष्परिणाम लगेचच दिसायला लागले असून घसा खवखवण्यापासून तापामुळे अंग फणफणण्यापर्यंत लक्षणे दिसू लागली आहेत. या आजारांमुळे फॅमिली डॉक्टरकडील रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. योग्य आहार व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाळा संपून कोरडी हवा व थंडीचे प्रमाण वाढले की सर्दी-तापाची लक्षणे दिसू लागतात. थंडीमध्ये तापमानात होत असलेल्या बदलांमुळे विषाणूंची वाढ अधिक होते. त्यातच गेल्या तीन चार दिवसात बदललेल्या हवामानामुळे सर्दी-ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिकच वाढले आहे.
शनिवार -रविवारी किमान तापमान १३ अंशावर गेले होते. त्यात सोमवार मंगळवारी आलेल्या ढगाळ वातावरणाने अचानक वाढ झाली. मंगळवारी सकाळी तर पावसाने रिमझिम सुरू केली. याचा परिणाम सर्दी तापाच्या रुग्णसंख्येवर झाला आहे.
सर्दी तापाच्या रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे, हे आजार ‘सेल्फ लिमिटिंग’ म्हणजे तीन ते चार दिवसात बरे होणारे असतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यास हे आजार होत नाहीत. सकस आहार आणि पुरेशी झोप यामुळे या आजारांपासून दूर राहता येते. असे महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राकेश दाभाडे यांनी सांगितले.
लहान मुले तसेच वृद्ध माणसे यांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असल्याने त्यांना विषाणूसंसर्ग लवकर होतो. त्यामुळे त्यांनी प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे.
दमा असलेल्यांनाही हवामान बदलाचा त्रास होतो. याशिवाय मधुमेह, हृदविकार, मूत्रपिंडविकार, यकृतविकार असलेल्यांनी या काळात अधिक काळजी घ्यावी. सर्दी, ताप तीन दिवसात बरा झाला नाही तर डॉक्टरांकडे जावे, असा सल्ला त्यांनी दिला.

*विषाणूंची वाढ का होते..
मुंबईत उष्ण व दमट हवामान असते. सकाळ व रात्रीच्या तापमानात विशेष फरक नसतो. या हवामानात बदल झाला, दिवसा व रात्रीच्या तापमानातील फरक वाढला की विषाणूवाढ जास्त वेगाने होते. हे हवामान विषाणूवाढीसाठी पोषक ठरते. विषाणूंची वाढ जास्त संख्येने झाली की संसर्गाचे प्रमाणही वाढते. साधा ताप म्हणजेच फ्लू हा विषाणूंमुळे होतो. त्याचप्रमाणे घसा खवखवणे, सर्दी होणे असे प्रकारही दिसतात. सर्दी, ताप यांच्यामुळे छाती भरणे, डोकेदुखी वाढते.
*काय खावे, काय नको..
थंड खाल्ल्याने सर्दी होण्याची शक्यता नसते. मात्र कोणताही पदार्थ मर्यादेत खाणे गरजेचे असते. हे पदार्थ घशातूनच शरीरात जात असतात. या पदार्थामुळे घशातील तापमान कमी झाले की तिथे विषाणूसंसर्गाला अधिक पोषक वातावरण मिळते. त्यामुळे गरम चहा, गरम दूध किंवा गरम पाणी हे आजीबाईच्या बटव्यातील उपाय यावेळी प्रभावी ठरतात.
*तंबाखूसेवन करणाऱ्यांना धोका..
तंबाखू खाण्याच्या किंवा सिगारेट ओढण्याचे व्यसन असलेल्यांना विषाणू संसर्ग झाल्यास त्यांची तब्येत अधिक बिघडते. अशा व्यक्तींना या साध्या आजारातही रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ शकते.