जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप केले जावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात जोरकसपणे उचलून धरली. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मागणीला पाठिंबा आहे, असे सांगितले खरे. मात्र, त्यात ठोसपणा नव्हता. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी समन्यायी पाण्याचा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडू, एवढेच सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात मराठा आरक्षणासाठीही घोषणाबाजी झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान काही युवकांनी अडथळा निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.
मराठवाडय़ात दुष्काळ असल्याने जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडावे व सर्व धरणांमध्ये पाण्याची पातळी समान असावी, अशी मागणी वारंवार केली जाते. जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यांतर्गत या अनुषंगाने सर्व ते केले जावे, अशी मागणी मंत्री टोपे यांनी लावून धरली. समन्यायी पाण्याबरोबरच वीजदेयक भरण्यास दोन महिन्यांची मुदत द्यावी, असेही ते म्हणाले. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड या विषयावर काय म्हणतात, याकडे सर्वाचे लक्ष होते. भाषणादरम्यान त्यांनी निळवंडे धरणातून गेल्या वर्षी दुष्काळात कसे पाणी सोडले, याचा उल्लेख केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाणी सोडावे लागेल, असे सांगितल्याचा उल्लेख आवर्जून केला. मात्र, समन्यायी पाणीवाटपावर ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी जायकवाडीच्या पाण्यावर बोला, असा आग्रहही केला. काहींनी घोषणा दिल्या. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी वीज व पाण्याचे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ, असे सांगितले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी जोरदार असली, तरी नेत्यांनी या प्रश्नी मात्र गुळमुळीत उत्तरे देऊन वेळ निभावून नेल्याची चर्चा कार्यक्रमानंतर होती.
पाणी, वीज या प्रश्नांबरोबरच मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, या साठीही घोषणाबाजी सुरू होती. विशेषत: सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ भाषणाला उभे राहिल्यानंतर घोषणांचा जोर वाढला. त्यांनी या प्रश्नी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे जाहीरही केले. मात्र, त्यांच्या भाषणात वारंवार अडथळा आणला गेला. अखेर ते म्हणाले, तुम्हा चार पोरांमुळे असे काही घडत नसते. राणेसाहेब ठरवतील, तेव्हाच या विषयी काहीतरी होईल. शेवटी घोषणा करणाऱ्या युवकांच्या बाजूला पोलीसही थांबविले गेले. उपमुख्यमंत्र्यांना खासगी विमान वेळेवर उपलब्ध न झाल्याने ते कार्यक्रमास येऊ शकले नाहीत, असा खुलासा जाधव यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
समन्यायी पाणीवाटप
जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप केले जावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात जोरकसपणे उचलून धरली.
आणखी वाचा
First published on: 08-09-2013 at 01:54 IST
TOPICSऔरंगाबाद (Aurangabad)AurangabadजायकवाडीJayakwadiराजेश टोपेRajesh Topeराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Equipped water distribution