देशात लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली असल्याने डिझेल आणि पेट्रोलमुळे प्रदूषण वाढत आहे. त्याचा परिणाम निसर्गावर आणि मनुष्याच्या जीवनावर होत आहे. जीवन निर्मळ, शुद्ध आणि प्रदूषण मुक्त होणे गरजेचे असल्यामुळे इथेनॉलचा उपयोग केला गेला पाहिजे. कचरा व दूषित पाण्यापासून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करून पैसा कमविता येतो आणि देश प्रदूषण मुक्त होऊ शकतो. आज देशाला त्याची गरज असल्याचे मत केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भारतातील सध्याची प्रदूषणाची समस्या पाहता इथेनॉलवर चालणाऱ्या प्रदूषणरहित ग्रीन बसचा प्रायोगिक तत्त्वावर नागपुरात शुभारंभ करण्यात आला. अत्याधुनिक अशा वातानुकूलित बसला हिरवी झेंडी दाखवून केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नागपूर महापालिका व स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल (इं) प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला भूतल परिवहन विभागाचे संयुक्त सचिव संजय बंडोपाध्याय, महापौर अनिल सोले, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, माजी खासदार दत्ता मेघे, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, ग्रीनपीसचे कौस्तुभ चटर्जी, उपमहापौर जैतुनबी अंसारी, स्थायी समिती सभापती नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त श्याम वर्धने, सत्तापक्षनेते प्रवीण दटके यांच्यासह विविध गटनेते उपस्थित होते.
डिझेल, पेट्रोलच्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. जीवन निर्मळ, शुद्ध आणि प्रदूषण मुक्त होणे गरजेचे असल्यामुळे इथेनॉलचा उपयोग केला गेला पाहिजे. विविध देशामध्ये इथेनॉलवर वाहने चालविली जात असल्यामुळे त्याठिकाणी प्रदूषण कमी आहे. पेट्रोलियम कंपन्यांना ५ टक्के इथेनॉल पुरविले जात आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल स्वस्त असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. शेतकरी मोठय़ा प्रमाणात उसापासून इथेनॉलची निर्मिती करू शकतात. त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये मोठय़ा प्रमाणात इथेनॉल तयार करणारे शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना याचा जास्त उपयोग होऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात इथेनॉलची निर्मिती केली जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रदूषणाच्या दृष्टीने नियमात काही बदल करावे लागले तर ते करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले.
यावेळी स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल कंपनीचे अँड्रय़ू ग्रँडस्ट्रामर म्हणाले, इथेनॉल बसेसचा गेल्या २० वर्षांंचा अनुभव असल्यामुळे येणाऱ्या काळात नागपूरला या बसची सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही बस चालविली जाणार असून त्याला प्रतिसाद चांगला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रिन्युएबल वाहन इंधनापैकी ९० टक्के हिस्सा इथेनॉलचा असून ते स्थानिक पातळीवर संपादन केले जाऊ शकते. त्यामुळे तेल आयात करण्याच्या गरजेमध्ये घट होईल. उपलब्धता, पायाभूत सोयीसुविधा आणि सुलभतेच्या दृष्टीने इथेनॉल सर्वात कमी दरातील जैविक इंधन आहे. कौस्तुभ चटर्जी, महापौर अनिल सोले आणि संजय बंडोपाध्याय, गिरीश गांधी यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक श्याम वर्धने यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा