व्यक्ती नाही, नीती बदलली तरच देशाच्या स्थितीत फरक पडण्याची शक्यता आहे, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य खासदार सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृहावर शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार बैठकीत येचुरी बोलत होते. सोलापूरचे माजी आमदार आडम मास्तर, कॉ. विठ्ठल मोरे, कॉ. संग्राम मोरे उपस्थित होते. भाजपमध्ये गडकरी जाऊन राजनाथ सिंह आले व आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले आहेत. मात्र, त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. कारण त्यांच्या धोरणात कोणताही फरक झाला नाही. भाजपा व काँग्रेसच्या आर्थिक धोरणात फारसा फरक नसल्याची टिप्पणी येचुरी यांनी केली. केंद्राने डिझेलच्या दरात दर महिन्याला एक रुपया वाढ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत असून गरीब अधिक पिचला जातो आहे. श्रीमंतांना करामध्ये सवलत दिली जात आहे व त्याचा बोजा सामान्य माणसावर लादला जात आहे. कम्युनिस्ट पक्षाचे हे धोरण आहे की, श्रीमंतांवरील कर वसूल करून सामान्य माणसांना सुविधा दिल्या पाहिजेत. देशातील चार भागांतून जनजागरण यात्रा काढण्यात येणार असून १९ मार्चला नवी दिल्लीत पक्षाच्या वतीने मेळावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबरच २० व २१ फेब्रुवारीला देशभरातील सर्व विचारांच्या कामगार संघटना एकत्र येऊन औद्योगिक हरताळ पाळणार असून स्वतंत्र भारतातील ही घटना ऐतिहासिक ठरेल, असेही येचुरी यांनी नमूद केले. लोकपाल विधेयक आता दहाव्यांदा संमत होत आहे. या वेळी तरी किमान त्याचे हसे होणार नाही, ही काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
व्यक्ती नाही, नीती बदलल्यासच देशाच्या स्थितीत फरक- येचुरी
व्यक्ती नाही, नीती बदलली तरच देशाच्या स्थितीत फरक पडण्याची शक्यता आहे, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य खासदार सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.
First published on: 03-02-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ethics change only can change country condition not person yechuri