रोजचा दिवस नवी आव्हाने घेऊन उगवतो. कालच्यापेक्षा आज अधिक चांगले काम करेन, या भावनेने काम करणे म्हणजेच उत्कृष्टता होय, असे प्रतिपादन सुरत येथील पोलीस उपायुक्त शोभा भुतडा यांनी केले.
डॉ. आनंद नाडकर्णी संचालित ‘वेध लातूर’मध्ये ‘ध्यास उत्कर्षांचा’ या विचारसूत्रावर मूळच्या लातूरच्या असलेल्या शोभा भुतडा यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. लातूरच्या गोदावरी शाळेत शिक्षण व राजर्षी शाहू महाविद्यालयात बी. कॉम. पदवी प्राप्त केलेल्या भुतडा या रेणापूरच्या. घरात फारशी शैक्षणिक पाश्र्वभूमी नसताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली व पहिल्याच प्रयत्नात मराठवाडय़ातील पहिली ‘आयपीएस’ होण्याचा मान मिळविला. प्रारंभी चार महिने जम्मू येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर गुजरातेत नडीयाद, गांधीनगर, जुनागड, अमरेली येथे पोलीस अधीक्षक व आता सुरतला पोलीस उपायुक्त म्हणून त्या कार्यरत आहेत.
लहानपणापासून वादविवाद व वक्तृत्व स्पध्रेत शोभा यांनी सहभाग घेतला. चेन्नईत एका स्पध्रेनिमित्त गेल्यानंतर तेथे आपली इंग्रजी कच्ची आहे, यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले, हा अनुभव त्यांना अंतर्मुख करणारा ठरला. शाळेत इंग्रजी विषयाचा चांगला अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत ९० गुण मिळाले. कमी अभ्यास असतो म्हणून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. सहज अभ्यास करीत बी. कॉम.ला विद्यापीठात पहिली येण्याचा मान मिळाला. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात अनेक जण चांगले यश प्राप्त करीत आहेत. आपला निर्णय चुकला का? अशी बोच मनाला असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. पहिल्याच परीक्षेत यश प्राप्त झाले. त्यानंतर राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद व मसुरी येथे घेतलेल्या प्रशिक्षणापर्यंतचा प्रवास उलगडून सांगताना शोभा भुतडा यांनी आपल्या आयुष्यातील हा सर्वोत्तम काळ, अशी आठवण सांगितली.
पहाटे सव्वापाच ते सायंकाळी साडेसहा अशी प्रचंड मेहनत केली. अशा मेहनतीची आयुष्यात सवय नव्हती. मात्र, सर्व प्रशिक्षण सर्वानीच पूर्ण केले. मेहनतीला आयुष्यात पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेतील यश व त्यासाठी घेतलेली मेहनत नोकरीच्या काळात उपयोगी ठरले. या क्षेत्रात रोजच परीक्षेला सामोरे जावे लागते, असे सांगून नारायणसाईची अटक व पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी सुरतमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. महिला अधिकारी असल्यामुळे लोकांकडून भरपूर कौतुक होते. लोक आपल्या कृतीकडे गांभीर्याने पाहतात, असा आपला अनुभव असल्याचेही त्या म्हणाल्या.
साहित्यिक संजय जोशी, शिल्पकार भगवान रामपुरे, मानववंश शास्त्रज्ञ डॉ. संजीव गलांडे, फोटो जर्नालिस्ट संदेश भंडारे यांच्याही प्रकट मुलाखती डॉ. नाडकर्णी यांनी घेतल्या. विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. धनंजय कुलकर्णी, उत्तम होळीकर आदींनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
शिक्षिकांचा ऊर भरून आला..
शोभा भुतडा यांच्या मुलाखतीच्या वेळी गोदावरी कन्या शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या शाळेची माजी विद्याíथनी मराठवाडय़ातील पहिली पोलीस अधीक्षक बनली, याचे या विद्यार्थिनी व शिक्षकांना कौतुक होते. शोभा भुतडा यांचा परिवारही उपस्थित होता. मुलाखत संपवून व्यासपीठावरून खाली उतरताच विद्यार्थिनी व शिक्षिकांनी त्यांना गराडाच घातला. अनेक शिक्षिकांची भुतडा यांनी गळाभेट घेतली. मी आज जी काही आहे ती तुमच्यामुळेच, असे भावोद्गारही भुतडा यांनी या वेळी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा