समाजात निर्माण झालेले विविध दोष दुर करण्याचे काम साहित्यिक व त्यांचे साहित्यच करु शकेल, यासाठी प्रत्येक घरात ग्रंथालय ही संस्कृती रुजायला हवी, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज ‘शरद पवार बुक फेस्ट-२०१२’च्या उद्घाटनप्रसंगी केले.
माजी आमदार राजीव राजळे यांच्या अदि फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावेडीतील जॉगिंग पार्कवर हे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे, त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पाच दिवस सुरु राहणाऱ्या या प्रदर्शनात राज्यभरातील ५० हुन अधिक नामवंत प्रकाशनगृहे सहभागी झाली आहेत.
मुले, तरुणांतील वाढती व्यसनाधिनता ही शाळा, पालकांच्या पराभवाची लक्षण आहे, कर्तृत्वसंपन्न पिढी व्यसनाला बळी पडते हे समाजाच्या भवितव्यासाठी योग्य नाही. पुर्वी धर्मसंस्था, घरातील आजी-आजोबा नितीमुल्यांचे, संस्काराचे शिक्षण देत. आता आई-वडिल दोघेही नोकरी करतात, मुलांवर संस्कार करणारे कोणी नाही. अशावेळी जीवन कशासाठी आहे व जगायचे कशासाठी याचे भान पुस्तकाच्या माध्यमातुन, लेखकांच्या चिंतनातुन तरुणांपर्यंत पोहचते असे पाटील म्हणाले.
मुलांना जन्म देणे सोपे आहे, परंतु त्यांची निकोप वाढ करणे सध्याच्या परिस्थितीमुळे अवघड झाले आहे, त्यासाठी प्रत्येक घरात मार्ग दाखवणारी हक्काची पुस्तकेच हवी आहेत, पुस्तके विकत घेऊन केवळ  साहित्यीक, प्रकाशकांनाच मदत होते, असे नाही तर मराठी भाषेचीही मदत त्यातुन होते, असेही त्यांनी सांगितले.
श्री राजळे यांनी स्वागत केले. पाटील यांच्या हस्ते काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी पुस्तकांच्या स्टॉललाही भेट दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनस्याम शेलार, जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे, शिवशंकर राजळे, योगिता राजळे आदी उपस्थित होते. स्नेहल उपाध्ये यांनी सुत्रसंचलन केले. किशोर मरकड यांनी आभार मानले. प्रदर्शनात मराठी, हिंदी, धार्मिक, नॅशनल बुक ट्रस्ट, बाल साहित्य, शालेय असे विविध विभाग आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा