अनाथ, निराधार बालकांसाठी आधाराश्रमात चालणारे काम पाहून समाधान वाटले. संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी अतिशय तळमळीने मनापासून या बालकांसाठी काम करत आहेत. आधाराश्रमातील प्रत्येक अनाथ बालकाला आई-बाबा मिळावे हीच आमची अपेक्षा आहे. नयनाच्या रूपाने आज आमचे कुटुंब पूर्ण झाले. तिच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
बुधवारी आधाराश्रमात नयना हिच्या दत्तक सोहळ्याप्रसंगी इटलीस्थित डी स्टेपॅनो नुका आणि बिलो डोनॅन टिला या दाम्पत्याने अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास बालआशा ट्रस्टचे सुनील अरोरा, दुभाषक मंजिरी पै, संस्थेचे विश्वस्त प्रभाकर केळकर, समन्वयक राहुल जाधव उपस्थित होते. सिकलसेल व्याधीने ग्रस्त नयनाचा आपली मुलगी म्हणून स्वीकार करताना तिच्याविषयीची भावनाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृतीचे आकर्षण, येथील इतिहास, कला यांची आवड असल्याने येथील बाळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. काराच्या ‘ऑनलाइन पोर्टल’च्या माध्यमातून नयना आम्हाला सापडली. इंटरनेटवर छायाचित्राच्या माध्यमातून नयनाची प्रतिमा मनात तयार झाली. नयनाला प्रत्यक्षात भेटल्यावर मनातील त्या प्रतिमेपेक्षा ती अधिक भावल्याचे बाबा डी स्टेपॅनो नुका यांनी नमूद केले. नयनाची मंगळवारी तिच्या आई-बाबांशी प्रथमच भेट झाली होती. तिच्यासाठी आई, बाबा, आजी, आजोबा, आत्या, मामा असे काही मराठी शब्द त्यांनी शिकून घेतले होते. अवघ्या काही तासांत नयना तिच्या आई-बाबांसमवेत चांगलीच रुळल्याचे पाहावयास मिळाले. नवखी असली तरी नयनाच्या देहबोलीतून, तिच्या बोलक्या डोळ्यांनी आई-बाबांना आपलेसे केले. रात्री आईच्या कुशीत विसावलेली नयना सकाळी थाटात आधाराश्रमात दाखल झाली. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, आधाराश्रमाचे काम पाहून नुका आणि टिला प्रभावीत झाले असून त्यांनी या संस्थेस पुन्हा भेट देणार असल्याचे सांगितले. पाच वर्षे नयनाचा सांभाळ करणाऱ्या आधाराश्रमातील मावशींनी तिचे औक्षण केले. मागील दोन ते तीन वर्षांत या स्वरूपाचे कार्यक्रम नयना स्वत: पाहात होती. इतरांप्रमाणे आपणास आई-बाबा आणि हक्काचे घर मिळाल्याचा आनंद तिच्या चेहेऱ्यावर झळकत होता. या आधी, आधाराश्रमातून काही शारीरिक व्यंग, आरोग्याच्या तक्रारी असलेली चार बालके परदेशात दत्तक गेली आहेत. त्यात स्पेन येथे समर्थ, आदित्य, इटली येथे परी गेली. रोम या ठिकाणी नयना जात असून लवकरच अंजुम मस्तान ही न्यूझीलंड येथे रवाना होणार आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडोप्शन रिसरेस अ‍ॅथोरिटीच्या (कारा) मदतीने आधाराश्रमाला हा प्रश्न सोडविण्यास मदत झाली. दत्तक सोहळा झाल्यानंतर नयनाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

Story img Loader