भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन बहुजन स्वराज महासंघाच्या वतीने येथील संत कबीर नगर येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुजन स्वराज संघाचे उमेदवार प्रमोद नाथेकर यांनी केले.
विकास व नागरी सुविधा सोडविण्यासाठी जनतेला विविध प्रकारांची आश्वासने देण्यात येत आहेत. प्रत्येक निवडणुकीप्रसंगी आश्वासने वगळता नागरिकांच्या जीवनमानात कोणताही बदल झाल्याचे जाणवत नाही. मतदार सर्वच क्षेत्रात पिछाडीवर असल्याचे जाणवते. मध्यस्थी किंवा इतर मार्गाचा वापर केल्याशिवाय कामे होत नसल्याचा नागरिकांना अनुभव आहे. संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार भेट देऊनही काम न झाल्याने नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते. असे असले तरी नागरी विकास, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणू अशा आश्वासनांची भुरळ मतदारांना घातली जाते. परंतु निवडणूक संपल्यावर मतदारांकडे कोणीही फिरकून पाहात नाही. त्यामुळेच मतदारांनी जागरूक राहून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता योग्य उमेदवारास निवडून द्यावे असे आवाहन नाथेकर यांनी केले. यावेळी शेख रफिक, साबीर शेख यांनीही बहुजन स्वराज महासंघाच्या वतीने उमेदवार उभा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला.