कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौर वैजयंती गुजर ११ मे रोजी पायउतार झाल्या. अडीच वर्षांच्या पालिकेच्या कार्यकाळात महापौर गुजर यांना प्रशासनाची तळी उचलता उचलता ठोस असे काही करता आले नाही, तरी काही चांगले निर्णय त्यांनी घेतले. गुजर या १३ लाख ९४ हजार ८८१ रुपयांच्या मालक आहेत. नोकरी, स्वकष्टातून ही मिळकत मिळविली असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला पालिका निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातून उघड होत आहे.
ही सर्व मिळकत महापौर गुजर यांच्या नावाने आहे. बँका, पतपेढी, एलआयसी व शेअर्समधील एकूण गुंतवणूक ४ लाख ८६ हजार रुपये आहे. सुमारे ९ लाख रुपये किमतीचे घर त्यांच्याच नावावर आहे, असे शपथपत्रातून उघड होत आहे. राजकीय स्वरूपाचे सात गुन्हे गुजर यांच्यावर आहेत. आयकर भरण्यास आपण पात्र नसल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.
महापौर पदानंतर आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या महापौरांची स्वप्ने पक्ष कसा पूर्ण करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गुजर यांच्या कार्यकाळात महासभेने आयत्या वेळचे १४ ठराव मंजूर केले. उपसूचनांद्वारे २९ ठराव मंजूर केले. इतिवृत्ताची वाट न पाहता ४६ ठराव मंजूर करण्यात आले.

वचननाम्याला फाटा
पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये तारांगण, डोंबिवलीत मत्सालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. रश्मी ठाकरे यांनी पु. भा. भावे सभागृह नूतनीकरण करण्याच्या सूचना तीन वर्षांपूर्वी केल्या होत्या. ही आश्वासने व सूचना लालफितीतून काढण्यात महापौरांना वेळ मिळाला नाही. रस्त्यावरील खड्डे, सुनील जोशींना पुन्हा सेवेत घेणे, आरोपी विजय पाटील यांच्या चौकशीस मान्यता न देणे, बडतर्फ अधिकाऱ्यांना सेवेत ठेवणे, संथोम ट्रस्ट समावेश आरक्षण, दौऱ्यांवर ११ लाखाची उधळपट्टी या कारणांमुळे महापौर टीकेच्या लक्ष्य बनल्या.

चांगली कामे
२८५ पालिका कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय
निदान केंद्र बंद करण्याचा निर्णय
डॉ. सरिता पाटील यांची शासनाकडे रवानगी
शिवाजी चौकातील शिवपुतळ्याचे उत्तरेकडे तोंड करणे
शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणे
बदनामी करणाऱ्या वर्तमानपत्रांवर खटला दाखल करण्याचा ठराव

विकासाचे ढीगभर प्रस्ताव मंजूर
* सात हजार कोटींचा वाहतूक आराखडा मंजूर
* राजीव आवास योजना दोन वर्षांपूर्वी सुरू होणे आवश्यक होते
* स्मशानभूमीत मोफत लाकडे, एलपीजी बसविणे
* ख्रिश्चनांना दफनभूमी नसणे
* स्मार्ट गव्हर्नन्स व पालिका सेवांचा दर्जा प्रस्ताव मंजूर
* डोंबिवलीत कंपनी बसना मज्जाव प्रस्ताव बारगळला
* वाडेघर मनोरंजन केंद्र मंजूर
* झुंझारराव मार्केट ते बस आगार पार्किंग, हॉकर्स झोन करणे
* अनधिकृत बांधकाम १३ अधिकारी बडतर्फ करणे
* झोपुतील २३५ लोकांना घरे देणे
* आयुक्तांच्या आजारपणाचे साडेपाच लाख मंजूर करणे
* उर्दू शाळांमध्ये शिक्षक नेमणे

Story img Loader