महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा नमुना विद्यार्थ्यांना पुन्हा पाहावयास मिळाला. शनिवारी सकाळी होणारा मंडळाच्या पदविकेच्या प्रथम सत्राचा गणिताचा पेपर एक दिवस आधीच बाजारात उपलब्ध झाल्यामुळे या पेपरची परीक्षा रद्द करण्याची वेळ मंडळावर आली.
गेल्या १२ नोव्हेंबरला तंत्रशिक्षण पदविकेच्या द्वितीय सत्राचा गणिताचा पेपर झाला. मात्र, तो पेपरही आदल्या दिवशी रात्रीच काही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्यामुळे मंडळाने परीक्षा रद्द ठरवून तो पेपर ४ डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले. परंतु पुन्हा प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका लातूर शहरात ७ हजार रुपये दराने विकली जात होती. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत हा आकडा कमी-अधिक होत गेला. शनिवारी सकाळी मंडळाने अखेर ही परीक्षा रद्द करून ती ४ डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले. अकरा वर्षांपूर्वी (२००२) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविकेच्या परीक्षेचे पेपर चोरले गेले होते. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा प्रसंग मंडळावर आला होता. आता ११ वर्षांनी पुन्हा एकदा पेपरफुटीचे संकट मंडळावर ओढवले. त्यामुळे खळबळ उडाली.
प्रश्नपत्रिका लिक होण्याचे नवनवे मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाले आहेत. मंडळाने पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळेच हा प्रकार घडल्याबद्दल विद्याथ्यार्ंत नाराजी होती. पुणे विद्यापीठात परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवशी दीड तास अगोदर ई-मेलने प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्यानंतर तातडीने संबंधित परीक्षा केंद्रावर िपट्ररमार्फत प्रती काढल्या जातात व त्या वितरीत केल्या जातात. या प्रकारामुळे किमान पुन्हा परीक्षा घेण्याचे प्रकार टाळता येऊ शकतात. पेपर फुटणे, चोरी जाणे या प्रकारांमुळे जे अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांची चांगलीच कुचंबणा होते. मंडळाने या संबंधी खबरदारी घेतली पाहिजे, अशा प्रतिक्रिया लातुरातील विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
औरंगाबादेतही गुन्हा दाखल
औरंगाबाद शहरातही शुक्रवारी रात्रीच तंत्रनिकेतनचा गणिताचा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब शनिवारी पहाटेस तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक संदीप विश्वरूपे यांच्या निदर्शनास आणली. त्याप्रमाणे विश्वरूपे यांनी शनिवारी सकाळी खातरजमा करून घेत हा पेपर रद्द केल्याचे कळविले. शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात स्वत: विश्वरूपे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दरम्यान, रात्रीतून या फुटलेल्या पेपरची अनेकांना तब्बल आठ हजार रुपयांना विक्री झाली होती. हा पेपर हाती पडलेल्या अनेकांनी त्याची दोन-तीन हजारांत परस्पर विक्री सुरू केली होती. पेपर फुटीचे प्रकरण वेळीच उजेडात आल्याने तंत्रशिक्षण मंडळाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Story img Loader