बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या (गुरुवार) सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी १५ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
जिल्हय़ात गेल्या ४ वर्षांपासून दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होत आहेत. ही परंपरा कायम ठेवण्याचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या दृष्टीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दहावीचे ४४ हजार ८०३ विद्यार्थी १३३ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. बारावीचे २६ हजार ८८ विद्यार्थी ७० केंद्रांवर परीक्षा देतील.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात, यासाठी सर्वच केंद्रांवर बैठे पथक स्थापन करण्यात आले आहेत. १५ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून यात वर्ग १ दर्जाचे अधिकारी नेमले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश अहिरराव, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींचा या पथकात समावेश आहे. ही पथके पोलीस बंदोबस्तात वेगवेगळय़ा तालुक्यांतल्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांची ३ विशेष पथके जिल्हय़ातल्या परीक्षा केंद्रांना भेटी देऊन अचानक तपासणी करणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.