जिल्ह्य़ात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी करणारा विद्यार्थी, त्यास मदत करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून संस्थाचालकांनी त्यांचे परीक्षा केंद्र कायम टिकविण्यासाठी केंद्रावर शंभर टक्के कॉपीमुक्त परीक्षा होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी दिल्या.
परीक्षेतील गैरव्यवहार टाळण्याबाबत दक्षता समितीची बैठक कांबळे यांच्या उपस्थितीत झाली. तहसीलदार प्रभोदय मुळे, शिक्षणाधिकारी बी. आर. देवगुडे, जिल्हा माहिती अधिकारी राजू धोत्रे, पोलीस उपअधीक्षक सुरेश बुधवंत आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी कांबळे म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ते नियोजन करण्यात आले असून वर्षभर नियमित अभ्यास करणारेच विद्यार्थी उत्तीर्ण होतील. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांना अभ्यास करूनच परीक्षा देण्यास सांगावे. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांला रेस्टीकेट करून पुढील वर्षांसाठी परीक्षा देण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार परीक्षा केंद्रांना वारंवार भेटी देऊन पाहणी करणार आहेत. संस्था चालकांनीही त्यांचे केंद्र कायम टिकवण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा घेणे गरजेचे आहे. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्याला मदत करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी दिला.

Story img Loader