गेल्या दहा महिन्यांत कुख्यात गुंड रवी पुजारी वगळता अन्य कोणीही खंडणीसाठी दूरध्वनी करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या टोळ्यांचे नाव वापरून खंडणीखोरी करण्याची पद्धत रुढ होत आहे. या प्रकरणी खंडणीविरोधी कक्षाकडे काही गुन्हे दाखल होऊन कारवाईही झाली आहे. रवी पुजारीसमवेत काही वेळा हेमंत पुजारीही सक्रिय असल्याचे दिसून आले होते. तो मात्र आता थंड पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खंडणीखोरीत माहिर असलेल्या दाऊद-छोटा शकील, छोटा राजन, नाईक-गवळी, कुमार पिल्ले या टोळ्या आता पुरत्या थंडावल्याचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनीही मान्य केले आहे.
खंडणीविरोधी कक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबधित गुन्हे खंडणीविरोधी कक्षाकडे दाखल करून घेतले जातात. परंतु गेल्या दहा महिन्यांत संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित एकाही गुन्ह्य़ाची नोंद झालेली नाही. मात्र या टोळ्यांच्या म्होरक्यांची नावे पुढे करून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला. परंतु तपासाअंती त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले. खंडणीखोरीमागे भुरटेच असल्याचे स्पष्ट झाले.
खंडणीखोरीचा ऱ्हास..
१९९९ च्या काळात मुंबईत खंडणीखोरी जोरात होती. खंडणीसाठी गोळीबार होण्याचे प्रकारही घडत होते. त्यातून काहींच्या हत्याही झाल्या. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त शिवानंदन आणि उपायुक्त म्हणून प्रदीप सावंत यांच्या काळात संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा कणा पार मोडला गेला आणि मग खंडणीखोरीला आळा बसू लागला, याकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले. विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्या काळात प्रदीप शर्मा आणि राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख राकेश मारिया यांच्या काळात विजय साळसकर हे खंडणीविरोधी कक्षाचे प्रमुख असताना संघटित गुन्हेगारांच्या खंडणीखोरीला वेसण बसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
आताची कार्यपद्धती
*दाऊद-छोटा शकील : खंडणीसाठी धमकी नाही. काही प्रकरणात तडजोडीसाठी दूरध्वनी. मात्र तक्रार नाही. अनेक म्होरके स्वत:च बांधकाम व्यावसायिक. कार्यकक्षा – दक्षिण मुंबई.
*छोटा राजन : अनेक म्होरके बांधकाम व्यावसायिक. प्रामुख्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अग्रेसर. कार्यकक्षा – पूर्व उपनगर, धारावी, चेंबूर.
*नाईक-गवळी टोळी : ना. म. जोशी मार्ग, सातरस्ता परिसरात तडजोडीच्या प्रकरणात अधूनमधून सहभाग. मात्र तक्रार दाखल नाही.
*गुरु साटम, कुमार पिल्ले : सध्या काहीही नाही.