केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयात गेल्या आर्थिक वर्षांत सर्वात जास्त सेवा कर चुकविणाऱ्या संस्थांची नावे, नागपुरातील सेवा कर न भरणाऱ्यांची संख्या आदी माहिती तयार स्वरुपात उपलब्धच नसल्याची बाब पुढे आली आहे. या कार्यालयाने गेल्यावर्षी ७३१ कोटी ८२ लाख रुपये सेवा कर वसूल केला.  
अप्रत्यक्ष करांमध्ये सेवाकराचा समावेश होतो. हा कर गोळा करून घेण्याची जबाबदारी केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाकडे आहे. विविध कार्यालये आणि आस्थापनांना हा कर भरणे आवश्यक आहे. अन्यथा कर चुकवणाऱ्यांवर कारवाई केली जाते. २०१२-१३ या वर्षांत केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर आयुक्त नागपूर कार्यालयाने सरलेल्या आर्थिक वर्षांत ७३१ कोटी ८२ लाख रुपये सेवा कर गोळा केला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, सुनील हायटेक इंजिनिअरिंग लिमिटेड, गम्मन इंडिया लिमिटेड, खनिज गवेषण निगम लिमिटेड, एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्यांनी या आर्थिक वर्षांत सर्वाधिक सेवा कर दिला आहे. ‘कार्पोरेशन, टेलिफोन एक्सचेंज, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट नागपूर, सिक्युरिटीज डिपार्टमेंट, फ्रॅक्ट्रिज या संस्थांकडून किती सेवा कर मिळाला’ या प्रश्नावर मात्र केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाने ही माहिती या कार्यालयात तयार स्वरुपात उपलब्ध नसल्याचे आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. असेच उत्तर देत सर्वात जास्त सेवा कर चुकविणाऱ्या पाच संस्थांची नावे, नागपुरातील सेवा कर भरणाऱ्यांची व न भरणाऱ्यांची संख्या आदी माहिती देण्याचेही या कार्यालयाने टाळले आहे.
केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षांत सेवा कर न भरणाऱ्या ३६ संस्थांवर छापे घालून ०.४०२५ कोटी रुपये सेवा कर वसूल केला. गेल्या वर्षांत सेवा कर न भरणाऱ्या एकूण ७१ संस्थांवर कारवाई करण्यात आली. एक उपायुक्त, तेरा अधीक्षक, २१ निरीक्षक, १ उपकार्यालय अधीक्षक, दोन वरिष्ठ कर सहायक, पाच कर सहायक, दोन हवालदार एवढय़ा मनुष्यबळाच्या आधारावर या कारवाया करण्यात आल्या आहेत.

Story img Loader