गोविंदा आला रे आला.. असे म्हणत दरवर्षीप्रमाणे यावर्षी २८ ऑगस्टला विदर्भातील विविध शहरांमध्ये गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धासह, शोभायात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दहीहंडी स्पर्धेसाठी गोविंदा पथकांनी तयारी सुरू केली आहे. दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने विदर्भात कोटय़वधी रुपयाची उलाढाल होत असून त्यात राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा समावेश असतो.
शहरात जन्माष्टमीनिमित्त यावर्षी उत्साहाचे वातावरण असून आठ दिवस आधीपासून शहरातील विविध गोविंदा पथकांनी तयारी सुरू केली आहे. शहर आणि ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थानी जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून दहीहंडी स्पर्धेचे फलक लावण्यात आले आहेत. शहरामध्ये बडकस चौक, मानेवाडा, इतवारी, गोकुळपेठ, रवीनगर, अंबाझरी, वर्धमाननगर, नरेंद्रनगर, श्रीकृष्ण नगर, खामला आदी ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेत कामठी, रनाळा, इतवारी, दहीबाजार आणि आसपासच्या खेडय़ातील अनेक चमू दहीहंडी स्पर्धा जिंकण्यासाठी शहरात येत असतात. यंदा गोकुळाष्टमी गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील गोविंदा पथकानी रात्र जागवून उंच मानवी मनोरे रचण्याची तालीमही सुरू केली आहे.
शहरातील काही मंडळानी १ लाखापासून ५ लाखापर्यंतच्या दहीहंडी बांधण्याची घोषणा केल्याने गोविंदा पथकांनी तयारी केली आहे. परिणामी गोपालकालाच्या दिवशी ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये लागणार आहे. इतवारी नवयुवक मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जात असून त्यातील विजेत्या पथकाला लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. सोनेगावच्या जयदुर्गा क्रिडा मंडळाच्या महिलांनी यासाठी पुढाकार घेतला असून शहरातील २५ महिलांच्या संघटना दहीहंडीमध्ये सहभागी होणार आहे. संजय खुळे यांच्या नेतृत्वाखाली इतवारीमध्ये दहीहंडी स्पर्धा आयोजित केली असून त्यात ५ लाख ५५ हजार रुपयापासून विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहे. ‘मेरा नागपूर मेरा अभिमान’ या विषयाला धरून दहीहंडी स्पर्धा घेण्यात येणार आहे.
खामला सिंध माता मंडळातर्फे नगरसेवक प्रकाश तोतवानी यांच्या नेतृत्वात, श्रीकृष्ण नगरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे, महानगर बहुउद्देशीय संस्थतर्फे टेलिफोन एक्सचेंज चौकात ज्ञानेश्वर झोडे यांच्या नेतृत्वाखाली,. पारडी नाका येथे मुरलीधर सेवा समितीतर्फे आणि रवीनगर चौकाजवळ मरारटोली मैदानावर दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्वच मंडळांमध्ये एक लाखाच्यावर गोविंदा पथकांसाठी पारितोषिके ठेवण्यात आली असून ती जिंकण्यासाठी गोविंदा पथके तयारीला लागली आहेत. विश्व हिंदू परिषदेतर्फे २८ ऑगस्टला वर्धामार्गावरील गोरक्षण मंदिरातून श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ राहणार आहे.
गोविदा पथकांमध्ये प्रचंड उत्साह
गोविंदा आला रे आला.. असे म्हणत दरवर्षीप्रमाणे यावर्षी २८ ऑगस्टला विदर्भातील विविध शहरांमध्ये
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-08-2013 at 08:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excitement in govinda pathak