धार्मिक व्रतवैकल्यांची धामधूम घेऊन आलेल्या श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत सणासुदीचा उत्साह आहे. पोळा, गणेशोत्सव आणि महालक्ष्मी या सणांची तयारी घरोघरी सुरू झाली असून बाजारात वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर महागाई कमी होईल, असे वाटत असताना महागाईने कळस गाठला आहे. महागाई असली तरी शहरातील विविध भागात आणि घरोघरी सणांच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
शहरात उत्साहाच्या वातावरणात कृष्ण जन्मोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात दहीहंडीचा उत्साह होता. चौकाचौकात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांतर्फे दहीहंडी स्पधार्ंचे आयोजन करण्यात आले. येत्या सोमवारी पोळा असल्यामुळे ग्रामीण आणि शहरात पोळ्याची तयारी सुरू झाली आहे. बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठा सज्ज झाल्या असून ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी करीत आहेत. विदर्भाची परंपरा असलेल्या तान्हा पोळ्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मारबत व बडग्याच्या मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. १३० वर्षे जुनी काळी आणि पिवळी मारबत तयार झाली असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाला दहा दिवसांचा अवधी असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे घरोघरी बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे. गणपतीच्या एक दिवस आधी हरतालिका आहे.
विदर्भातील विविध भागातील मूर्तीकार रात्रंदिवस गणपतीच्या मूर्ती घडविण्याच्या कामाला लागले असून यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मूर्तीकारांकडे मूर्तीची आगावू मागणी करणाऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. घरोघरी गणेशोत्सव आणि महालक्ष्मीच्या सणांची तयारी सुरू झाली आहे. कोणाकडे दीड दिवसाचा तर कोणाकडे दहा दिवसांचा गणपती उत्सव असतो. घरोघरी सकाळ संध्याकाळी आरती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विविध सार्वजनिक गणेश मंडळाची सजावट पाहण्यासाठी लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते.
त्यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जातो. शहरातील काही भागात लोकवर्गणीतून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते गणेश उत्सव सुरू होताच तर तीन दिवसांनी घरोघरी महालक्ष्मीची पूजा असते. दोन महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे सगळीकडे राजकीय वातावरण तापत असले तरी श्रावण आणि भाद्रपदामध्ये येणाऱ्या सणासुदीमधील लोकांचा उत्साह कमी होत नाही.
सणासुदीचा उत्साह
धार्मिक व्रतवैकल्यांची धामधूम घेऊन आलेल्या श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत सणासुदीचा उत्साह आहे.
First published on: 23-08-2014 at 07:19 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excitement of festivals