राज्यभरातील प्राध्यापकांनी वर्षभरानंतर पुन्हा बहिष्काराचे अस्त्र काढले असून विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे प्राध्यापक महासंघातर्फे (एमफुक्टो) राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेच्या कामावर ४ फेब्रुवारीपासून बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
राज्य सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणेच प्राध्यापकांना त्यांचे ८० टक्के अ‍ॅरिअर्स मिळावेत. प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट देण्याबाबत शासन निर्णय काढावा आणि त्यांना सर्व लाभ देण्यात यावेत. विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही सहाव्या वेतन आयोगाचे लाभ मिळावेत. प्राचार्य आणि प्राध्यापक यांचे निवृत्तीचे वय एकच असावे. अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी एमफुक्टोने बहिष्काराचा मार्ग अवलंबला आहे. याबाबत एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले, ‘‘गेल्या वर्षी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्यावर प्राध्यापकांनी बहिष्कार टाकला होता. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उच्चशिक्षण मंत्र्यांबरोबर एमफुक्टोची बैठक झाली होती. त्यावेळी जून २०१२ पर्यंत सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन प्राध्यापकांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्राध्यापकांच्या समस्यांबाबत शासनाने काहीही पाऊल उचलले नाही. दरम्यानच्या काळात संघटनेने विविध प्रकारे आंदोलने केली. मोर्चे काढले, धरणे आंदोलन केले, उपोषण केले मात्र शासनाने दाद दिली नाही. त्यामुळे आता परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.’’

Story img Loader