वस्त्रोद्योगात झपाटय़ाने बदलणाऱ्या तांत्रिक क्षेत्रातील आधुनिकीकरणाचा मनोहारी आविष्कार साकारणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन रविवारी मुंबईत सुरू झाले. पाच दिवस चालणाऱ्या इंटरनॅशनल टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर एक्झिबिशनला उद्योजक, अभ्यासक, शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ झाला. वस्त्रोद्योगातील विविध पंधरा टप्प्यांतील यंत्रांचे आधुनिक स्वरूप थक्क करून टाकणारे आहे. बेचाळीस देशांतील अद्ययावत यंत्रांची येथे मांडणी करण्यात आली असून १ लाख लोक प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. प्रदर्शनाच्या जोडीलाच तांत्रिक विषयावरील तज्ज्ञांचे चर्चासत्र, वस्त्रोद्योगासाठी सोयीसुविधा मिळणाऱ्या विविध देशांचे माहिती कक्ष, उद्योजक, चर्चासत्र, विदेशी शिष्टमंडळाशी चर्चा, अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय क्षेत्राची माहिती याचे इत्थंभूत दर्शनही येथे घडणार आहे.     
आंतरराष्ट्रीय यंत्रसामुग्रीची माहिती देणारे प्रदर्शन दर चार वर्षांनी भारतात भरविले जाते. यावर्षीच्या प्रदर्शनाची तयारी गेली दोन वर्षे सुरू होती. देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रात त्याकरिता रोड-शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणून मुंबईतील गोरेगावमध्ये भरलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जगभरातून प्रतिसाद मिळाला. वस्त्रोद्योग आयुक्त ए.बी.जोशी, बिर्ला उद्योग समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, वस्त्रोद्योगाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ.श्रीकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. आयुक्त जोशी यांनी केंद्र शासनाच्या वतीने वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. वस्त्रोद्योगासाठी देशभरात क्लस्टर योजना व एक्सलंन्स सेंटर सुरू करण्यात आले असून त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग आधुनिकीकरणाच्या मार्गावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेक्निकल टेक्स्टाईल या क्षेत्रामध्ये व्यापक संधी असल्याने केंद्र शासनाने अधिकाधिक प्रोत्साहन उद्योजकांना देण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुमारे ५५ हजार चौरस फुटाच्या वातानुकूलित दालनात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जगभरातील ४२ देशांतील ६२० उद्योजकांच्या यंत्रसामुग्री, सुटेभाग याची मांडणी करण्यात आलेली आहे. एकंदरीत १५ टप्प्यांमध्ये त्याची विभागनिहाय सादरीकरण करण्यात आले आहे. मुळातच वस्त्रोद्योग हा अनेकविध टप्प्यातून, प्रक्रियेतून जात असतो. कापूस पिंजण्यापासून ते तयार कपडे करण्यापर्यंत विविध प्रक्रिया त्यामध्ये पार पडतात. त्यामुळे यंत्रसामुग्रीचे स्वरूपही तितकेच वैविध्यपूर्ण असते. अन्य उद्योगांच्या तुलनेने वस्त्रोद्योगांच्या यंत्रसामुग्रीमध्ये होणाऱ्या बदलांचे, आधुनिकीकरणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी नवनव्या आणि अधिक कार्यक्षम यंत्रसामुग्रीची भर वस्त्रोद्योगात पडत असते. त्यामुळे या प्रदर्शनात स्पिनिंग, व्हिव्हिंग, निटिंग, होजिअरी, एब्रॉयडरी, वॉशिंग-ब्लिचिंग, डाईंग, पेटिंग, फिनिशिंग, गारमेंट, टेस्टिंग, ट्रान्सपोर्ट, पॅकेजिंग, रिसायकलींग तसेच प्रदूषण रोखणारे सॉफ्टवेअरविषयक शैक्षणिक अशा विविध टप्प्यांमध्ये यंत्रसामुग्रीची व त्यांच्या सुटे भागांची मांडणी करण्यात आली आहे.     
केवळ यंत्रसामुग्रीची तांत्रिक माहिती देण्यापूरते हे प्रदर्शन मर्यादित नाही. वस्त्रोद्योगाच्या विकासाला जगभर गती मिळावी, असा उद्देशही यामागे आहे. त्यासाठीच वस्त्रोद्योग यंत्रसामुग्रीत नव्याने आलेले तंत्र याची माहिती देणारे चर्चासत्र चार दिवस भरविले जाणार आहे. प्रदर्शनातील यंत्रसामुग्रीची खरेदी-विक्री करता यावी. तसेच उद्योजकांना परस्परांशी संवाद साधता यावा, यासाठी उद्योगक चर्चासत्र भरविण्यात आले आहे. जगातील अनेक देश त्यांच्या भूमीत वस्त्रोद्योग वाढावा यासाठी अनेक सोयीसुविधा देत आहेत. असाच प्रयत्न देशातील वस्त्रोद्योगात पुढाकार असलेल्या राज्यांनीही चालविलेला आहे. देश-विदेशात चाललेल्या या घडामोडींची माहिती देणारे कक्ष प्रदर्शनात उभे करण्यात आले आहेत.
भारतात शेती खालोखाल वस्त्रोद्योग हा सर्वात मोठा उद्योग आहे. वस्त्रोद्योग वाढावा यासाठी शासनाने अनेक योजना तसेच सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी बहुतेक बँकांनी हात पुढे केला आहे. वित्तीय क्षेत्र यासंदर्भात कोणते प्रयत्न करत आहे, याची माहिती मिळावी असाही प्रयत्न या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात करण्यात आला आहे. प्रदर्शनात ४२ देशांतील यंत्रसामुग्रीसह त्यांचे उद्योजकही येथे येणार आहेत. विदेशातील उद्योजकांच्यात सुसंवाद व्हावा, यासाठी विदेशी शिष्टमंडळासमवेत चर्चा-बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. वस्त्रोद्योगातील यंत्रसामुग्रीची आधुनिकता अधोरेखित करण्याबरोबरच हे प्रदर्शन वस्त्रोद्योगाच्या परस्परांवरअवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांवर प्रकाशझोत टाकणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा