रेल्वे अर्थसंकल्पात जे प्रकल्प किंवा नव्या योजनांच्या घोषणा केल्या जातात, त्या वेळेत पूर्ण झाल्या आहेत, असे पाहायला मिळत नाही. त्यामुळे या योजना पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा आणि दिलेल्या वेळेत ते प्रकल्प पूर्ण केले जावेत. लोकप्रियता मिळविण्यासाठी भरमसाठ नव्या योजना किंवा प्रकल्प जाहीर करण्यापेक्षा निवडक योजना जाहीर करून त्या पूर्ण कराव्यात. मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र इतक्या मोठय़ा संख्येत प्रवासी असूनही रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईला सापत्न वागणूक दिली जाते. मुंबईच्या तुलनेत कमी प्रवासी संख्या असलेल्या कोलकोता ला स्वतंत्र विभाग म्हणून जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत, खोपोली आणि कसारा, चर्चगेट ते डहाणू छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल, असा मिळून स्वतंत्र विभाग जाहीर केला जावा. मध्य आणि पश्चिम रेल्वेला स्वतंत्र महाव्यवस्थापक असून दोन्ही रेल्वेचा कारभार स्वतंत्रपणे चालतो. दोन्ही रेल्वेचा कारभार एकत्र करावा.
काही महत्वाच्या मागण्या पुढीलप्रमाणे. त्यावरही विचार व्हावा
२०१२-१३ या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पण ज्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशा आमच्या मागण्या
* डहाणूसाठी उपनगरी लोकल
* मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील काही महत्वाच्या स्थानकांवर सरकते जिने
* वसई-दिवा-पनवेल हा विभाग उपनगरी रेल्वे म्हणून जाहीर
* नवीन ७५ उपनगरी गाडय़ा
* हार्बर रेल्वे मार्गावर बारा डब्यांच्या गाडय़ा
* पनवेल येथे कोच टर्मिनस
* कळंबोली येथे सी.एम. कॉम्प्लेक्स
० ‘एमयुटीपी’च्या टप्पा-२ मध्ये नवी मुंबईहून देशभरात
जाण्यासाठी गाडय़ा सोडल्या जाव्यात.
० छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि
सहाव्या मार्गाचे काम
० परळ टर्मिनस व्हावे. ज्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे
एकमेकांना जोडली जाईल.
० ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम
मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही
रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षीच महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. मुंबईला दिले म्हणजे सर्व महाराष्ट्राला दिले, अशी रेल्वेची समजूत असेल तर ती चुकीची आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी महाराष्ट्राला काही भरीव मिळावे, असे वाटते.
काही महत्वाच्या मागण्या
०पुण्याहून अहमदाबाद, इंदूर, जोधपूर, जयपूर आणि अन्य काही ठिकाणी सुटणाऱ्या गाडय़ा आठवडय़ातून एक किंवा दोन दिवस धावतात. त्या दररोज असाव्यात.
० पुणे-मुंबई मार्गावर एलिव्हेटेड रेल्वे सुरू केली जावी.
० कोकण रेल्वेवर रत्नागिरी-मंगलोर-कारवार अशी गाडी सुरू केली जावी. त्याचा फायदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मिळेल.
– हर्षां शहा , (रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा