नगरदेवळा येथे २२ दिवसाआड पाणी पुरवठा
उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच जिल्ह्यात दुष्काळाच्या चटक्यांची झळ बसु लागली आहे. पाचोरालगतच्या नगरदेवळा येथे आताच २२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. तर जळगाव व एरंडोल तालुक्याने गिरणेच्या पाण्यासाठी आग्रह धरला आहे. जळगाव शहरातही टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता असून फेब्रुवारीत ही स्थिती तर एप्रिल-मे मध्ये काय होणार,
याची चिंता सर्वसामान्यांसह प्रशासनालाही भेडसावत आहे. गत पावसाळ्यापासून टंचाईची झळ सोसणाऱ्या नगरदेवळाच्या ग्रामस्थांनी आता पाण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. सुमारे तीस हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात सध्या २० ते २२ दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन करावे व तातडीने टँकर सुरू करावा, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून आपला रोष प्रगट केला. नगरदेवळा येथे याच कारणावरून यापूर्वी तीव्र आंदोलन छेडले गेले होते. त्यावेळी गाव बंद ठेवताना जाळपोळीच्याही घटना घडल्या होत्या. इतके सारे घडूनही स्थानिक प्रशासन पाणी प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी ही समस्या सोडविणे जमत नसल्यास सरपंच व सदस्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली आहे. उन्हाळ्यातील गावातील हे संकट अधिक भीषण होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अग्नावती नदी पात्रात अवैध विहिरी खोदून पाणी चोरी सुरू आहे. सामान्य नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, अशी तक्रार करत संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बांगडय़ा फोडून निषेध व्यक्त केला.
एरंडोल व जळगाव तालुक्यातील काही गावातही टंचाईची झळ बसू लागली आहे. गिरणा धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन तालुक्यातील अनेक गावापर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे तेथील संकट गंभीर बनले आहे. तेव्हा दोन्ही तालुक्यातील टंचाईग्रस्त गावापर्यंत पाणी पोहचेल, अशी प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गिरणा धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन दापोरा बंधाऱ्यापर्यंत आल्यावर बंद करण्यात आले. परिणामी, एरंडोल तालुक्यातील कढोली, खेडी-खुर्द, दापोरा, आव्हाणी, वैजनाथ, टाकरखेडा, बांभोरी, भोकणी तर जळगाव तालुक्यातील शिरसोली, मोहाडी, धानोरा, फुपणी, नागझरी, सावखेडा, कानळदा आदी गावे कोरडीच राहिली. गिरणेचे आवर्तन आणखी तीन दिवस सुरू ठेवले असते तर उपरोक्त गावांचा पाणी प्रश्न सुटला असता. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अंजनी धरणातून एक आवर्तन सोडल्यास सुमारे तीस गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागेल, असे माजी आमदार गुलाब पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जळगाव शहराला देखील टंचाईच्या झळा बसत आहे. सद्यस्थितीत शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. शहराची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाचा मृतसाठा त्यासाठी वापरला जात आहे. मृतसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होत असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची काय स्थिती राहील, याविषयी नागरिकांमध्ये चिंतेचा सूर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा